बीड, दि. 10 :- बालकांमध्ये मातीतून प्रसारीत होणाऱ्या कृमीदोषांवर प्रतिबंध
करण्यासाठी बीड जिल्ह्यात 10 फेब्रुवारी आणि 15 फेब्रुवारी या दोन दिवशी दोन टप्प्यात
राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त मोहिम राबविण्यात येत असून या मोहिमेअंतर्गत आज जिल्हाधिकारी
नवल किशोर राम यांच्या हस्ते बीड शहरातील अशोक नगर येथील जिल्हा परिषद प्राथामिक शाळेतील
बालकांना गोळ्या वितरीत करण्यात आल्या. यावेळी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, मुख्य कार्यकारी
अधिकारी नामदेव ननावरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार 1 ते 14 वर्षे
वयोगटातील बालकांमध्ये मातीतून प्रसारीत होणाऱ्या आतड्यांच्या कृमी दोष आढळून आला आहे.
याचे प्रमुख कारण म्हणजे वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचा अभाव असणे हे आहे. या कृमी दोषांचा
संसर्ग दुषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे होऊन बालकांचे आरोग्य धोक्यात येते. यामुळे
राज्यभरात 10 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहिम राबविण्यात येत आहे. या दिवशी
राहिलेल्या बालकांना 15 फेब्रुवारी रोजी दुसऱ्या टप्प्यात गोळ्या खायला दिल्या जाणार
आहेत. बीड जिल्ह्यात साधारणत: 7 लाख 83 हजार
497 अपेक्षित लाभार्थी बालकांची संख्या असून आज दिवसभर अंगणवाडी केंद्र व शाळांमधील
बालकांना गोळ्या वितरीत करण्यात आल्या. 1 ते
19 वर्षे वयोगटातील बालकांना या जंतनाशक गोळ्या आवश्यक त्या प्रमाणात वयानुसार दिल्या
जाणार आहेत.
अशोक नगर येथील जिल्हा परिषद शाळेतील मुला-मुलींना
गोळ्या वाटप करुन खाऊ घालण्यात आल्या. यावेळी गटशिक्षणाधिकारी मधुकर मोराळे, विस्तार
अधिकारी सिध्देश्वर माटे, मुख्याध्यापक मदन लांडगे यांच्यासह शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी
उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा