बीड, दि. 10 :- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीसाठी होणारे मतदान
धारुर तालुक्यात शांततामय वातावरणात होण्यासाठी यंत्रणेनी प्रतिबंधात्मक उपाययोजना
प्रभावीपणे कराव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीच्या
पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी राम यांनी पोलीस अधिक्षक जी. श्रीधर यांच्या
समवेत धारुर तालुक्याचा शुक्रवारी दौरा केला. यावेळी तालुक्यातील निवडणूक निर्णय अधिकारी
तथा उस्मानाबादचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) टी.के.नवले, सहाय्यक निवडणूक
निर्णय अधिकारी तथा तहसीलदार राजाभाऊ कदम यांच्यासह क्षेत्रीय अधिकारी,कक्ष अधिकारी
व पोलीस अधिकारी उपस्थित होते. तहसील कार्यालयातील
सभागृहात निवडणूक कामकाजाचा आढावा घेताना जिल्हाधिकारी राम पुढे म्हणाले की, क्षेत्रीय
अधिकाऱ्यांनी अत्यंत सतर्क राहून मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी विशेष
लक्ष द्यावे. धारुर तालुक्यातील सर्व मतदान केद्रांच्या ठिकाणी सुविधा निर्माण कराव्यात.
यासोबतच तालुक्यात आचारसंहितेचा भंग होणार
नाही याची दक्षता घ्यावी. अशी प्रकरणे लक्षात आल्यास भंग करणाऱ्यांविरुध्द कडक
कार्यवाही करण्यात यावी. दहशत व धाकदपटशाची माहिती मिळाल्यास प्रतिबंधात्मक कार्यवाही
करण्यात यावी. निवडणूक प्रक्रीयेला बाधा येणाऱ्या संभाव्य घडामोडीकडे यंत्रणांनी विशेष
लक्ष द्यावे असेही जिल्हाधिकारी राम यांनी सुचित केले.
धारुर तालुक्यात जिल्हा परिषदेचे 3 गट
आणि पंचायत समितीचे 6 गण आहेत. यासाठी तालुक्यात 105 मतदान केंद्र स्थापन करण्यात येत
असून यापैकी 19 संवेदनशील आणि 6 अतिसंवेदनशील मतदान केंद्र आहेत. याठिकाणी जास्तीत
जास्त कडक बंदोबस्त लावण्याच्या तसेच सीसीटीव्ही व व्हिडीओ कॅमेरे लावण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी दिल्या.
पोलीस अधिक्षक जी. श्रीधर यांनीही या बैठकीत
मतदान केंद्र व मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्ताविषयी पोलीस अधिकाऱ्यांना
निर्देश दिले. जिल्हाधिकारी राम व पोलीस अधिक्षक जी. श्रीधर यांनी मतमोजणी केंद्र व
स्ट्राँगरुमची पाहणी केली. याशिवाय त्यांनी धारुर तालुक्यातील जहांगीरमोहा व अंबेवडगाव
येथील मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली व निवडणूक अधिकाऱ्यांना उपयुक्त सूचना
केल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा