बीड, दि. 2 :- जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या
वतीने बीड जिल्ह्यात ग्रामीण भागातील विविध विकासाची कामे तसेच गोरगरीब जनतेच्या वैयक्तिक
लाभाच्या योजनांची कामे अधिक वेगाने पूर्ण करावीत असे निर्देश जिल्हा ग्रामीण विकास
यंत्रणेचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांनी
दिले.
बीडच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या
कार्यकारी समितीची बैठक ननावरे यांच्या अध्यक्षतेखाली लॉर्ड बेडन पॉवेल स्काऊट सभागृहात
घेण्यात आली यावेळी ते बोलत होते. या बैठकीस विभागीय उपायुक्त (विकास) सुर्यकांत हजारे,
अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त रविंद्र
शिंदे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मधूकर वासनिक, अग्रणी बँक अधिकारी विजय चव्हाण,
प्रकल्प संचालक संगीता पाटील आदि मान्यवर तसेच विविध विभागाचे अधिकारी व गटविकास अधिकारी
उपस्थित होते.
या बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना, इंदिरा
आवास योजना, रमाई आवास योजना व राजीव गांधी ग्रामीण निवारा योजनांचा पूर्ण-अपूर्ण कामांचा
आढावा घेण्यात आला. शबरी आदिवासी घरकुल योजना, पंडीत दिनदयाळ उपाध्याय ग्रामीण घरकुल
योजना, ग्रामीण जीवनोन्नती अभियान, रुरबन अभियान, ग्रामीण कौशल्य योजनांच्या प्रगतीचाही
यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला. कामे अधिक पारदर्शक व गतीमान पध्दतीने पूर्ण करतांना
लोकप्रतिनिधी व ग्रामसभेच्या आवश्यक त्या मान्यता घेण्यात याव्यात. गोरगरीब जनतेच्या
प्रगतीच्या योजना राबवितांना अधिकाऱ्यांनी गरजू लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता
घ्यावी असे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांनी यावेळी केले.
या बैठकीस अधिकारी-कर्मचारी तसेच समितीचे
सदस्य उपस्थित होते.
नियामक मंडळाची बैठक
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या नियामक
मंडळाची बैठक याच ठिकाणी दुपारी घेण्यात आली. या बैठकीतही तालुकानिहाय कामांचा आढावा
घेण्यात आला. या बैठकीस आष्टी पंचायत समितीच्या सभापती प्रियंका सावंत आणि अंबाजोगाई
पंचायत समितीच्या सभापती उषा किरदंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा