बीड, दि. 1 :- जागतिक एड्स दिनानिमित्त बीड
जिल्हा रुग्णालयातील जिल्हा एडस व नियंत्रण
विभागातर्फे रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीस छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून
सुरुवात झाली. अतिरिक्त सत्र न्यायाधीस स.रा. कदम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी नामदेव ननावरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव श्री.भोसले, जिल्हा
शल्य चिकित्सक डॉ.नागेश चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदिप सांगळे आदि मान्यवरांच्या
हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीस सुरुवात करण्यात आली.
रॅलीस शिवाजी चौकातून सुरुवात करण्यात आली.
रॅलीमध्ये स्वामी विवेकानंद नर्सिंग कॉलेजच्या आर.आर.सी. च्या युवकांनी पथनाट्य सादर
केले. तसेच होऊन सारे एकसंघ, करुया एचआयव्हीचा प्रतिबंध हे फलक नागरिकांचे
लक्ष वेधून घेत होते. वचन पाळा एडस
टाळा आदि घोषणा रॅलीत सहभागी विद्यार्थी, नागरिकांनी दिल्या. शाहीर ठोंबरे यांच्या
तांबवेश्वर कलापथकाने एडस जनजागृतीपर सादर केलेल्या पोवाड्याने लक्ष वेधून घेतले. ही
रॅली कारंजा मार्गे बलभिम चौक, सुभाष रोड ते साठे चौकातून बसस्थानकासमोरुन जाऊन डॉ.बाबासाहेब
आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे सांगता करण्यात आली. रॅलीत सहभागी झालेल्या अशासकीय
संस्था, महाविद्यालये, शाळांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागेश
चव्हाण म्हणाले की, अक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिन्ड्रोम अर्थात एचआयव्ही चा विषाणू
मानव कोषिकांवर हल्ला चढवितो व रोग प्रतिकार शक्ती कमी करतो. कालांतराने शरीरातील सांसर्गिक
आजारांशी लढण्याची नैसर्गिक शक्ती क्षीण होते अशी अवस्था येताच निरनिराळे संसर्ग एचआयव्ही
संक्रमित व्यक्तीला संसर्ग करतात आणि त्या व्यक्तीत विकसीत होतात. एचआयव्ही एका व्यक्तीच्या
शरीरातून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करु शकतो. यामध्ये एचआयव्ही, एड्स संसर्गित
व्यक्तीसोबत असुरक्षित लैंगीक संबंध केल्याने, गर्भवती मातेकडून तिच्या बाळाला, एचआयव्हीचा
संसर्ग झालेल्या सुईचा वापर केल्यामुळे व एचआयव्ही संसर्ग झालेले रक्त दिल्याने व घेतल्याने
होत असतो. असे सांगून एचआयव्ही कसा आला व काय काळजी घ्यायला पाहिजे याबाबत सविस्तर
मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले.
यावेळी शिक्षणाधिकारी श्री. शशिकांत हिंगोणेकर
यांनी युवकांनी पुढाकार घेवून एचआयव्ही बाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती कार्यक्रमात
सहभागी होऊन आपले आरोग्य चांगले कसे राहील याची काळजी घेणे गरजेचे आहे असे सांगितले.
इन्फंट इंडियाचे संचालक दत्ता बारगजे म्हणाले की,
समाजातील एचआयव्ही बाधीत मुलांना सामाजिक संस्थेत घरातीलच सदस्य टाकत असतात.
मी गेल्या अकरावर्षापासून एचआयव्ही बाधीत मुलांसोबत राहून त्यांची देखभाल करत आहे मला
किंवा माझ्या घरातील कोणत्याही सदस्याला एचआयव्हीचा संसर्ग झाला नसल्याने समाजातील
सर्व घटकांनी एचआयव्ही बांधीतासोबत कोणताही भेदभाव न करता काळजी घेऊन त्यांची देखभाल
करावी व माणूसकीची वागणूक द्यावी असेही त्यांनी यावेळी सांगीतले.
कार्यक्रमाच्या शेवटी एड्स दिनाची शपथ देवून
राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला. यावेळी डॉ.संजय पाटील, डॉ.एस.एच.मोगले, डॉ.आय.व्ही.शिंदे,
डॉ.लहाने, डॉ.कोकणे, डॉ.जयश्री बांगर,डॉ.निपटे, डॉ.मेथे, श्रीमती सांगळे, श्रीमती रुपदे,
तत्वशिल कांबळे, ओमप्रकाश गिरी, नितिन गोपन, रोटरी क्लब ऑफ मीडटाऊन व आरोग्य क्षेत्रातील
विविध अधिकारी, कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थीनी, नागरिक यांची मोठ्या संख्येने
उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्रीमती साधना गंगावणे
यांनी केले तर आभार जे.एस.माचपल्ले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुहास कुलकर्णी,
फारुकी फसीयोद्दीन, एम.एस.इंगळे, फसी इनामदार, प्रविण शेलमुकर, अमोल घोडके, मंगल ढाकणे,
संतोष डोलारे, प्रशांत मुळे, कमलाकर लांब, वैजनाथ खंडागळे, शेख सलिम यांनी परिश्रम
घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा