गुरुवार, १ डिसेंबर, २०१६

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मराठवाड्यात 514 कोटीचे 130 रस्ते - ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे






·        पुढील टप्प्यात 140 कामांचा समावेश
·        ग्रामीण भागाचे चित्र पालटणार
·        बीड जिल्ह्याला 168 कोटी
                  
          बीड, दि. 1 :- ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मराठवाड्यातील बीडसह आठ जिल्ह्यात 1079 कि.मी. लांबीच्या 130 रस्त्यांच्या 514 कोटी 3 लाख रुपयांच्या कामांना मंजूरी दिली असून याशिवाय पुढील टप्प्यात 864 कि.मी. च्या 140 रस्त्यांच्या कामांचे नियोजन असल्याची माहिती राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री तथा बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
          महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था, बीडच्या वतीने आयोजित मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यातील 168 कोटी 59 लाख 52 हजार रुपयांच्या रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते परळी वैजनाथ तालुक्यातील वाणटाकळी येथे झाला. यावेळी त्यांच्या हस्ते मांडेखेल-अस्वलांबा-वाणटाकळी या 4.5 कि.मी. रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमात पालकमंत्री मुंडे बोलत होत्या. या कार्यक्रमास डॉ.ज्ञानोबा मुंडे, फुलचंद कराड, परळी पंचायत समितीच्या सभापती विद्या गडदे, उपसभापती बिभिषण फड, अंबाजोगाई पंचायत समिती सभापती जीवनराव किरदंत, जिल्हा परिषद सदस्य श्रीहरी मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
          ग्रामीण भागातील न जोडलेल्या वाड्या वस्त्या जोडण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेबद्दल ग्रामविकास मंत्री मुंडे पुढे म्हणाल्या की, ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात येणार असून मंजूर करण्यात आलेल्या कामांपैकी मराठवाड्यात प्रत्यक्षात 60 कामांना सुरुवात झाली असून अनेक कामे निविदा स्तरावर आहेत. मराठवाड्यातील दूर्गम भागातील रस्त्यांची अवस्था सुधारण्यावर भर दिला जात असून डिसेंबर 2018 पर्यंत ग्रामीण भागात एकही रस्त्याचे काम शिल्लक राहणार नाही असा निर्धार आहे. असे सांगून मुंडे म्हणाल्या की, प्रत्येक गावात पिण्याचे पाणी आणि दळणवळणासाठी पक्की सडक हे स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे स्वप्न होते. ते पूर्ण करण्यासाठी ग्रामविकास विभाग प्रयत्नशील आहे. त्यांच्या संकल्पनेतील ग्राम सडक योजना राज्यात राबविण्यात येत असून ग्राम स्वच्छता अभियान परळी आणि अंबाजोगाई तालुक्यात प्रभावीपणे राबविण्यात यावे अशी सुचना त्यांनी यावेळी केली.
          मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत  बीड जिल्ह्यात 366 किमी लांबीच्या रस्त्यांची 58 कामे मंजूर असून त्यासाठी 168 कोटी 59 लाख 52 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या माध्यमातून जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे सांगून पंकजा मुंडे यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीन विकासाच्या आपल्या निर्धाराचा पूनरुच्चार केला. यावेळी त्यांनी वाणटाकळी आणि परिसरातील गावांच्या विकासाकडे आपले विशेष लक्ष असल्याचे सांगून विविध विकास कामांच्या नियोजनाची त्यांनी माहिती दिली.
          यावेळी बोलतांना फुलचंद कराड म्हणाले की, ग्रामीण भागातील रस्ते विकासाचे महत्वाचे काम शासनाने हाती घेतले आहे. यामुळे गावे आणि गावकरी समृध्द होतील. ई निविदा पध्दतीमुळे रस्त्याची कामे दर्जेदार व टिकावू होणार असल्याने  सर्वांनी निश्चिंत रहावे असेही ते म्हणाले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य श्रीहरी मुंडे यांनी वाणटाकळीला जोडणाऱ्या रस्त्याचे काम मंजूर केल्याबद्दल पालकमंत्री मुंडे यांचे आभार मानले. ग्रामस्थांतर्फेही शासनाचे आभार मानन्यात आले. यावेळी महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेच्यावतीने एच.एन.सानप यांनी योजनेची माहिती प्रास्ताविकात दिली.

          या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, अधिक्षक अभियंता एस.टी.कोळीकर, कार्यकारी अभियंता ए.एम.बेद्रे, संचालक नामदेव आघाव, सदस्य वृक्षराज निर्मळ, मोतीराम चोपडे, रमेश कराड, जीवराज ढाकणे, प्रभाकर फड, रामेश्वर मुंडे आदि मान्यवर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा