सोमवार, १० ऑक्टोबर, २०१६

अंबाजोगाई तालुक्यातील नुकसानग्रस्त भागातील शेतीची कृषि राज्यमंत्री खोत यांच्याकडून पाहणी






         बीड,दि. 10:- अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर, सायगाव आणि चतुरवाडी या गावातील अतिवृष्टीने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. त्या गावांना कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी भेटी देऊन तेथील सोयबीन व तूर पिकांची पाहणी केली. त्यानंतर शेतकऱ्यांशी संवाद साधून खरीपातील नुकसान झालेल्या पिकांबाबत अडचणी जाणून घेतल्या. महसूल व कृषि विभागाकडून टक्केवारी निश्चित करुन त्याचा अहवाल तात्काळ शासनास सादर करण्याचे आदेश त्यांनी संबंधित विभागाला दिले. तसेच प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याला पिक विम्याचा लाभ मिळाला पाहिजे, याकरिता शेतकऱ्यांशी समन्वय ठेवून काम करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.  
             यावेळी माजी आमदार पाशा पटेल, उपविभागीय कृषि अधिकारी एस.एस.हजारे, नायब तहसीलदार डी.एस.इटलोड यांच्यासह कृषि व महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासह शेतकरी, पदाधिकारी  उपस्थित होते.
श्री.खोत यावेळी म्हणाले की,पंतप्रधान पिक विमा योजनेत सहभागी न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करुन त्या शेतकऱ्यांना एन.डी.आर.एफ.निधीअंतर्गत मदत मिळण्यासाठी अहवाल तात्काळ सादर करण्याच्या सूचना केल्या.  तसेच अतिवृष्टीने नुकसान झालेल्या खरीप पिकांच्या नुकसानांची पिक निहाय माहिती घेऊन पिक विमा  योजनेच्या लाभापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही,याची दक्षता घेण्याच्या सूचनाही यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.            

                                                      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा