मंगळवार, ११ ऑक्टोबर, २०१६

नूतन न्याय मंदिराचे पावित्र्य जपा - मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती रविंद्र घुगे






         बीड, दि. 11:- 65 कोटी 42 लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या बीड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीचे उदघाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती तथा न्यायिक बीड जिल्ह्याचे पालक न्यायमुर्ती रविंद्र घुगे यांच्या हस्ते झाले. या सुसज्ज व नूतन न्यायमंदिराचे सर्वांनी पावित्र्य जपावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
            या उदघाटन समारंभास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती संभाजी शिंदे, न्यायमुर्ती विश्वास जाधव, न्यायमुर्ती संगीतराव पाटील, बीडचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल पानसरे आणि वकील संघाचे अध्यक्ष ॲड.मंगेश पोकळे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
            उदघाटनपर भाषणात न्या.घुगे पुढे म्हणाले की, जिल्हा न्यायालयाची इमारत अत्यंत सुंदर झाली असून बीड शहराच्या सौदर्यांत आणि वैभवात भर पाडणारी आहे. या इमारतीचे सौंदर्य जपण्याचे काम सर्व वकील, कर्मचारी व पक्षकारांनी करावयाचे आहे. सुंदर इमारतीत प्रवेश करतांनाच प्रत्येकाने या इमारतीच्या सौंदर्याची जपणूकीची भूमिका घेतली पाहिजे. या न्यायमंदिरात सामान्यातल्या सामान्य माणसालाही जलद न्याय मिळाला पाहिजे आणि प्रत्येक गुन्हेगाराला कडक शिक्षा झाली पाहिजे यादृष्टीने प्रयत्नशील रहावे. असे सांगून त्यांनी वकीलांना सखोल मार्गदर्शन केले.
            औरंगाबाद खंडपीठाला जास्तीत जास्त न्यायमुर्ती दिलेला जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ख्याती मुंबई उच्च न्यायालयात असल्याचे सांगून न्या.घुगे यांनी जुन्या व जेष्ठ न्यायमुर्ती आणि विधीज्ञांचे नव्या न्यायमंदिराच्या निमित्ताने कायम स्मरण ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी अशा जेष्ठ न्यायमुर्ती व विधीज्ञांच्या नावासह आपल्या भाषणात उल्लेख करुन त्यांच्या योगदानाबद्दल गौरव केला. बीड जिल्ह्यातील प्रलंबित दिवाणी व फौजदारी प्रकरणांच्या वाढलेल्या संख्येबाबत चिंता व्यक्त करुन न्या. घुगे यांनी अधिक गतीने प्रकरणे निकाली काढण्यासाठी वकीलांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.
            मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती विश्वास जाधव यांनी बीड न्यायालयातील आपल्या वकीली व्यवसायाच्या काळातील आठवणी सांगितल्या व  नूतन न्यायालय इमारतीमुळे वकील व पक्षकारांच्या अडचणी दूर होतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
            मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती संभाजी शिंदे यांनी  यावेळी आपल्या भाषणात कायदा आणि घटनेतील मुलभूत बाबीकडे सर्वांचे लक्ष वेधले. घटनेने बहाल केलेल्या अधिकारांची जाणीव सर्वसामान्य लोकांना करुन देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे असे सांगून त्यांनी या नवीन इमारतीत सामन्‍य माणसाला न्याय देण्याची प्रक्रीया अधिक गतीमान होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.
            प्रारंभी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल पानसरे यांनी प्रास्ताविकात नूतन इमारतीविषयी व जिल्हा व सत्र न्यायालयाच्या कामकाजाविषयी माहिती दिली. वकील संघाचे अध्यक्ष ॲड.मंगेश पोकळे यांनी आपल्या मनोगतात इमारत उभारणीच्या कामामध्ये योगदान दिलेल्यांचा उल्लेख करुन त्यांचे आभार मानले.

            या कार्यक्रमास न्यायिक अधिकारी, न्यायाधीश, जेष्ठ विधीज्ञ यांच्यासह आमदार जयदत्त क्षीरसागर, आमदार विनायक मेटे, गटनेते भारतभूषण क्षीरसागर आदि मान्यवर तसेच वकील व नागरिक उपस्थित होते. शेवटी न्यायाधीश विदवंस यांनी सर्वांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा