गुरुवार, १३ ऑक्टोबर, २०१६

राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाच्या कार्यवाहीला अधिक गती देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राम यांनी घेतला आढावा




बीड , दि. 13 :-  राष्ट्रीय महामार्ग आणि अहमदनगर-बीड -परळी वैजनाथ या रेल्वेमार्गाच्या कामासाठी करावयाच्या बीड जिल्ह्यातील भूसंपादन कार्याचा आढावा घेऊन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी या कामाला अधिक गती देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या व रेल्वेमार्गाच्या कामासाठी संबंधित अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेऊन जिल्हाधिकारी राम यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला.
अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ रेल्वेमार्गासाठीच्या भूसंपादन कार्यवाहीचा आढावा घेऊन जिल्हाधिकारी राम म्हणाले की, वाढीव जागेच्या मागणीनूसार भूसंपादनाच्या कार्यवाहीला गती आणावी. पूर्वीच्या मागणीप्रमाणे भूसंपादन करतांना प्रत्येक स्तरावरील प्रगतीकडे विशेष लक्ष ठेवणे गरजेचे आहे. एखादे पथक तयार करुन शेतकऱ्यांना भूसंपादन कार्यवाहीबाबत मार्गदर्शन करण्यात यावे.
भूसंपादन प्रकरणातील मावेजा वाटपाच्या कार्यवाहीचा आढावा घेऊन उर्वरित शेतकऱ्यांना तात्काळ मावेजा वाटपाचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. संबंधित भुसंपादन आधिकारी व रेल्वे विभागाने मावेजा वाटपाच्या कार्यवाहीचा अद्ययावत अहवाल सादर करण्याचे निर्देश देवून जिल्हाधिकारी राम म्हणाले की, भूसंपादन कार्याला गती देण्यासाठी तलाठी स्तरावरही स्वतंत्र बैठका घेऊन मार्गदर्शन करण्यात आले आहे. यावेळी त्यांनी रेल्वेमार्गाच्या कामातील अडीअडचणी जाणून घेतल्या.
राष्ट्रीय महामार्ग
राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी सुरु असलेल्या भूसंपादन कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेऊन जिल्हाधिकारी राम बैठकीत म्हणाले की, संपादित जमीनीचा तात्काळ ताबा घेऊन काम सुरु करण्यात यावे. काही शेतकऱ्यांच्या दराच्या असमाधनतेबाबत तक्रारी असतील त्या प्रकरणात प्रशासन सकारात्मकपणे कार्यवाही करणार आहे. त्यांच्याविषयी प्रशासन सहानुभूतीपूर्वक विचार करेल मात्र सदरील शेतकऱ्यांकडून रेल्वेमार्गाच्या कामामध्ये अडथळा निर्माण केल्यास त्यांना फौजदारी स्वरुपाच्या कारवाईला तोंड द्यावे लागेल तरी त्यांनी शासकीय कामकाजात अडवणूक करु नये असा इशारा ही जिल्हाधिकारी राम यांनी या बैठकीत दिला.
महामार्ग रस्त्याच्या कामांना अधिक गती मिळून तो विहीत कालावधीत पूर्ण करण्यासाठी भूसंपादनाची कामे युध्दस्तरावर करण्यात येत आहेत. असे सांगून त्यांनी या बैठकीत संपादित जमिनी, मावेजा वाटपाच्या तसेच सुनावणीच्या कामाचा आढावा घेतला व मावेजा वाटपाची कार्यवाही तात्काळ करण्याचे निर्देश दिले. जमिनीच्या मावेजा वाटपासाठी प्राप्त झालेल्या निधीचा आढावा घेऊन अजून लागणाऱ्या निधीसाठी पाठपुरावा करण्याची सुचना अधिकाऱ्यांना करुन जिल्हाधिकरी राम यांनी शेतकऱ्यांना मावेजा वाटप वेळेत होईल याची दक्षता घेण्याचे आवाहन केले.

या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकरी चंद्रकांत सुर्यवंशी, भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी कल्याण बोडके, उपविभागीय अधिकारी गणेश निऱ्हाळी तसेच भूमिअभिलेख, बांधकाम, रेल्वे, महामार्ग, आयआरबी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा