गुरुवार, १ सप्टेंबर, २०१६

जिल्हाधिकारी राम व पोलीस अधिक्षक पारस्कर यांचे आवाहन उत्सव-सण शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी पुढाकार घ्यावा जिल्हा शांतता समितीची बैठक संपन्न




          बीड, दि.1:- नजिकच्या कालावधीत येणारे गणेशोत्सव व बकरी ईद यासारखे उत्सव-सण जास्तीत जास्त शांततामय वातावरणात, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून साजरे करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर यांनी केले.
          गणेशोत्सव आणि इतर सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक घेण्यात आली यावेळी ते बोलत होते. या बैठकीस गणेशोत्सव व स्पर्धा समितीचे सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, अप्पर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे, उपअधिक्षक डॉ.हरी बालाजी, उपअधिक्षक गणेश गावडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, सहाय्यक जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक बोल्डे तसेच उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आदि अधिकारी आणि शांतता समिती सदस्य उपस्थित होते.
          जिल्हाधिकारी नवल किशोर राम यावेळी म्हणाले की, सण आणि उत्सव साजरे करण्यामागे आपापल्या समाजाच्या धार्मिक भावना जोपासण्याचे व त्याचा सदैव आदर करण्याचा प्रत्येकाची भूमिका असावी. आपल्या जिल्ह्यातील नागरिक सर्वधर्मसमभावाने दरवर्षी धार्मिक सण शांततेत साजरे करीत आहेत. ही चांगली परंपरा यापुढेही चालु राहणार आहे. यासाठी सर्वांनी योगदान द्यावे. उत्सव काळात रस्ते दुरुस्ती, वीज, पाणी आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करुन दिले जातील. असे सांगून त्यांनी सामाजिक सौहार्द टिकवून ठेवण्यामध्ये बीड जिल्ह्याने नेहमी अग्रेसर राहण्याचा मान मिळविला असून येथील नागरिक नेहमी जिल्हा‍ प्रशासनाला सहकार्य करीत आहेत. यावेळी बैठकीत सदस्यांनी मांडलेल्या सुचनांची दखल घेऊन प्रशासन योग्य ती खबरदारी घेणार आहे. प्रशासनातील सर्व विभाग या उत्सव कालावधीत अधिक सक्रीय राहून कामकाज करतील असेही ते म्हणाले.
          गणेश मंडळांनी विद्युत रोषणाई करतांना विजेमुळे दूर्घटना होणार नाही याची प्रतिबंधात्मक व्यवस्था ठेवावी. पाण्याचा अपव्यय टाळावा. दारु आणि व्यसनावर निर्बंध ठेवावेत. महिलांचे रक्षण होईल याची काळजी घ्यावी. उत्सव काळात सर्व सदस्य-पदाधिकाऱ्यांची वागणूक चांगली राहिल याची खबरदारी घ्यावी. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. सोशल मिडियातून मोठ्या प्रमाणात अफवा पसरवून शांतता बिघडण्याचा प्रयत्न होऊ शकतो. खात्री केल्याशिवाय अफवांवर विश्वास ठेवून नका असे सांगून जिल्हाधिकारी राम यांनी सर्व सण-उत्सव शांततामय वातावरणात पार पाडले जातील यासाठी सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले. पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर म्हणाले की, सण-उत्सव हे अधिक चांगल्या पध्दतीने साजरे व्हावेत या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने ही समन्वयासाठी बैठक आयोजित केली आहे. उत्सव अधिक आनंददायी व्हावा यासाठीही सर्वजण सहभागी व्हावे. प्रत्येक गणेश मंडळांना एक आचारसंहिता देण्यात येईल. त्याचे त्यांनी पालन करावे. यावर्षी चांगला पायंडा पडला असून डॉ.आंबेडकर जयंतीपासून उत्सव डीजेमूक्त झाले आहेत. आता गुलालाचाही वापर कमी केला जात असल्याचे सांगून पोलीस अधिक्षक पारस्कर यांनी उत्सव कालावधीत पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात येणार आहे मात्र सर्व सुजाण व उत्सवप्रेमी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.
गणेश मंडळासाठी स्पर्धा
          लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियानाविषयी माहिती देतांना  या अभियानाच्या राज्य शासनाने नियुक्त केलेल्या समितीचे सदस्य बसवराज मंगरुळे म्हणाले की, लोकमान्य टिळकांनी जनजागृतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव आयोजित करण्याची प्रथा सुरु केली. या गणेश मंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून सामाजिक जनजागृती करणाऱ्या गणेश मंडळांना तालुका, जिल्हा व विभागीय स्तरावर रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. मंडळांनी 4 सप्टेंबरपर्यत आपले अर्ज गटशिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात दाखल करुन स्पर्धेत सहभागी व्हावे. स्वदेशी, साक्षरता, बेटी बचाओ, व्यसनमुक्ती आणि जलसंवर्धन यापैकी एका कल्पनेशी निगडीत देखावा करणे आवश्यक असून शासनाने नियुक्त समितीकडून देखाव्याचे परिक्षण करण्यात येऊन पुरस्कार जाहिर करण्यात येणार आहेत. या स्पर्धेत बीड जिल्ह्यातील जास्तीत जास्त गणेश मंडळांनी सहभाग नोंदवावा असे आवाहनही सदस्य मंगरुळे यांनी यावेळी केले.
          सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे सध्या 160 वे जयंती वर्ष सुरु आहे. लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सावाच्या चळवळीला पुढील वर्षी 125 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने राज्य शासनाने लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान व लोकमान्य उत्सव असे विविध कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने गणेश मंडळांनी कार्यवाही करावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांनी केले व स्पर्धेविषयी सविस्तर माहिती सांगितली.
          या बैठकीस जिल्ह्यातील गणेश मंडळाचे पदाधिकारी व इतर मान्यवर तसेच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा