बीड, दि.1:- बीड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय
महामार्ग क्र.211 या रस्त्यावरील खड्डयांची प्रत्यक्ष पाहणी जिल्हाधिकारी नवल किशोर
राम यांनी अधिकाऱ्यांच्या समवेत करुन पावसानंतर लगेच सर्व खड्डे बुजविण्याचे निर्देश
अधिकाऱ्यांना दिले.
शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील खड्डयामुळे
होणाऱ्या दुर्घटनेबद्दल चिंता व्यक्त केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी
राम यांनी राष्ट्रीय महामार्ग क्र.211 च्या सध्यस्थितीचा आढावा आयआरबीचे प्रकल्प व्यवस्थापक
अनिल दंडे यांना बोलावून घेतला. पावसापूर्वी या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले असले
तरी पावसामुळे ते टिकत नाहीत असा अनुभव आला असल्याचे दंडे यांनी सांगितले. परंतू जिल्हाधिकारी
राम यांनी त्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण काम करुन हे रस्ते दुरुस्त करण्याचे निर्देश
दिले व हे रस्ते खड्डेमुक्त होतील याकडे लक्ष देण्याबाबत सुचित केले. शहरातील अन्विता
हॉटेल, बसस्थानक ते बिंदुसरा नदीवरील पुलापर्यंतच्या दोन्ही बाजूंच्या रस्त्यांची पाहणी
जिल्हाधिकारी राम यांनी आज केली. या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी अंती दुरुस्तीच्या आवश्यक
त्या सुचना करतांनाच त्यांनी मोटार वाहन कायद्याचे व रस्ता वाहतुकीच्या नियमांचे पालन
वाहनचालकांनी करणे आवश्यक असल्याचे सांगुन अशाप्रकारे दुर्घटना होण्याचे टाळता येवू
शकते असेही ते म्हणाले. या रस्त्यावरील शहरातील खड्डयांचे प्रमाण फारसे नाही मात्र
सध्या पाऊस सुरु असल्याने पाऊस थांबल्यानंतर तातडीने हे खड्डे बुजविण्याचे काम हाती
घेण्यात येईल. असेही जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.
-*-*-*-*-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा