सोमवार, १२ सप्टेंबर, २०१६

किडीचे व रोगांचे व्यवस्थापण शेतकऱ्यांनी वेळीच करुन पिकाचे नुकसान टाळावे



बीड, दि. 12 :- बीड तालुक्यात सद्यस्थितीत कापुस या पिकावर मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, पिठ्या ढेकुण, लाल कोळी, बोंड अळी, कापुस पिकाच्या पानांच्या कडा लाल होत आहेत. तसेच पावसाच्या प्रदिर्घ खंडामुळे कापसाची पातेगळ होत आहे. किडींचे व रोगांचे व्यवस्थापण शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करुन पुढील होणारे पिकाचे नुकसान टाळावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी डी.पी.जाधव यांनी केले आहे.
बीटी कपाशीमुळे कपाशीचे क्षेत्र आणि उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. बोंडअळीसाठी फवारणी कमी झाली आहे. पण रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यासाठी किटक नाशकांच्या फवारणीच्या संख्येत आणि खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. याचे प्रमुख कारण किटकनाशकांचा अतिरेकी वापर होय. यासाठी किडीनूसार किटक नाशकाची फवारणी आणि इतर पध्दतीचा अवलंब करुन किड व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. गेल्यावर्षी बीटी कपाशीचे 70 टक्यापेंक्षा जास्त नुकसान गुलाबी बोंडअळीमुळे झाले होते. यासाठी दररोज दुपारी 3 नंतर कपाशीपिकांमध्ये निरीक्षण करावे. निरीक्षण करतांना जर एखादे फुल पिवळे दिसले तर तात्काळ ते तोडावे अशा फुलाचे तोंड  एकदम घट्ट चिकटलेले दिसेल यालाच डोमकळी असेही म्हणतात. अशावेळी फुलाच्या पाकळ्या वेगळ्या केल्यास अशा फुलांमध्ये एक ते दोन गुलाबी बोंड अळ्या आपणास पहावयास मिळतील तोडलेली फुले तात्काळ नष्ट करावी. फवारणी करतांना क्लोरोपायरीफॉर्स 50 टक्के आणि सायपरमेथ्रीन 5 टक्के एकत्रित असलेले किंवा प्रोफेनोफॉस 40 टक्के आणि सायपरमेथ्रीन 4 टक्के मिश्रण 2 मि.ली. व 10 ग्रॅम युरीया प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. एकरी 3 ते 5 डेल्टा स्टीकी ट्रॅप लावावे.

पिक तणमुक्त ठेवावे, बांधावर असणाऱ्या किडीच्या पुरक वनस्पतींचा नाश करावा, शेतात अगदी सुरवातीलाच किड रोगग्रस्त झाडे दिसताच उपटून नष्ठ करावी, शिफारशीनूसार खतांची मात्रा द्यावी, नत्राचा अतिरिक्त वापर टाळावा, पिवळ्या रंगाला पांढऱ्या माशा आकर्षित होऊन चिकटतात व मरतात म्हणून पिवळे चिकट सापळे कपाशीच्या शेतात लावावेत,  संकरीत वाणाकरीता इमिडॅक्लोप्रीड 70 डब्ल्यू.एस. किंवा थायमिथॉक्झॅम 70 डब्ल्यू.एम. 5 ते 7 ग्रॅम प्रति किलो ग्रॅम बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रीया केल्यास 30 ते 35 दिवसापर्यंत रस शोषण करणाऱ्या किडींच्या प्रादुर्भावापासून संरक्षण होण्यास मदत होते त्यामुळे पहिली फवारणी लांबवता येते, पिकाच्या सुरुवातीच्या काळात इमिडॅक्लोप्रीडची फवारणी टाळावी, कीटकनाशकांचा वापर अलटून पालटून करावा, सिरफीड माशी, पॅन्टोटोमीड ढेकूण, कातीन, भुंगे, चतूर, रॉबरमाशी इत्यादींचे संरक्षण करावे, फवारणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी करावी दुपारी करु नये, असे बीडचे तालुका कृषी अधिकारी यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा