बीड, दि. 13 :- ग्रामस्थांनी नाते जबाबदारीचे माध्यमातून
आपल्या नातेवाईकांना तसेच मित्र परिवाराला उघड्यावर शौचास न जाता घरी शौचालय बांधून
त्यांचा नियमित वापर करण्यास प्रवृत्त करावे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी नामदेव ननावरे यांनी केले.
बीड तालुक्यातील पिंपळनई येथे माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,
माहिती कार्यालय आणि जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या संवादपर्व
कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सदस्य अशोक दाभाडे, सरपंच सुरेश वायभट, चेअरमन बाळु वायभट, गटविकास
अधिकारी डॉ.ज्ञानोबा मोकाटे, विस्तार अधिकारी के.वाय.शेळके, यांची प्रमुख उपस्थिती
होती.
पुढे बोलतांना मुख्य कार्यकारी अधिकारी ननावरे म्हणाले की,
ग्रामस्थांनी गावामध्ये शोष खड्डे करुन घरावरील पाणी त्यामध्ये सोडून पाणी पातळीत वाढ
करावी आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी शौचालय घरोघरी बांधावेत असा संकल्प गावातील सर्व
गावकऱ्यांनी करावा. जेणेकरुन गावातील वातावरण निरोगी व आनंदी राहून गावात वावरतांना
आपल्या चेहऱ्यावर एक वेगळे समाधान राहिल. उघड्यावर शौचास गेल्याने विविध प्रकारचे रोग
होत असतात यामध्ये स्त्रीयांना गर्भाशयाच्या पिशवीचा कॅन्सर, तर लहान मुल कमी वजनाचे
जन्मणे तसेच त्यांची वाढ खुंटणे यासारखे आजार हे फक्त शौचास उघड्यावर गेल्याने होत
असतात. यामुळे गावकऱ्यांनी दसऱ्यापर्यंत आपल्या गावात 100 टक्के शौचालय बांधून आपले
गाव हागणदारीमुक्त करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच त्यांनी गावकऱ्यांकडून
दसऱ्यानंतर आम्ही उघड्यावर शौचास जाणार नाही अशी गणरायासमोर प्रतिज्ञा दिली.
या वर्षीच्या उपक्रमात करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीचा आढावाही
त्यांनी यावेळी घेतला. एक झाड लावणार आणि एक झाड जगवणार असा संकल्प करावा असेही त्यांनी
यावेळी सांगितले. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून हातपंप, विहिर आणि बोअर यांना पाणी
आले आहे यामुळे श्रमदानातून मोठ्या प्रमाणात जलसंधारण करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
नरेगाच्या माध्यमातून शोष खड्डे मंजूर करावेत. अशी सुचनाही त्यांनी गटविकास अधिकारी
यांना केली.
संवादपर्व उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही आपल्या गावात येवून
आपणाशी प्रत्यक्ष संवाद साधत आहोत याचे समाधान वाटते असलयाचेहिी ते यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमास शालेय विद्यार्थी, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा