बीड, दि. 13 :- ग्रामस्थांनी स्वयंप्रेरणेतून हागणदारी मुक्त
गाव मोहिमेमध्ये मध्ये आपल्या गावाचा समावेश केला असून आता दिवाळीपर्यंत अंजनवती
100 टक्के हागणदारीमुक्त होणार यात शंका नाही असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी नामदेव ननावरे यांनी केली.
बीड तालुक्यातील अंजनवती येथे माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,
माहिती कार्यालय आणि जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या संवादपर्व
कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सरपंच कैलास येडे, सामाजिक कार्यकर्ते सुनिल येडे,
गटविकास अधिकारी डॉ.ज्ञानोबा मोकाटे, विस्तार अधिकारी कल्याण शेळके यांची प्रमुख उपस्थिती
होती.
पुढे बोलतांना श्री. ननावरे म्हणाले की, अंजनवती गावात एक
गाव एक गणपती असल्याने गावाची एकी यातून दिसून येते. यामुळे गावाचा निश्चीतच विकास
होत असतो. प्रत्येक ग्रामस्थांनी आपल्या घरी शौचालय बांधून त्यांचा नियमित वापर करुन
आपले व आपल्या गावाचे आरोग्य अबाधित ठेवावे असे मत व्यक्त केले. तसेच गावातील लोकांनी
श्रमदानातून गावातील जलसंधारणासाठी कामे करावीत आणि त्यातून आपल्या गावाचा पाण्याचा
प्रश्न सोडवावा असे सांगून गटविकास अधिकाऱ्यांनी नरेगाच्या माध्यमातून गावासाठी शोष
खड्डे मंजूर करावेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.
श्री.ननावरे यांनी सांगितले की, नेकनूर मधील 300 महिलांची
आरोग्य तपासणी कॅन्सरतज्ञ डॉक्टारांकडून केली असता गावातील उघड्यावर शौचास जाणाऱ्या
75 महिलांना गर्भाशयाच्या पिशवीचा कॅन्सर असल्याचे निदान झाले आहे. यामुळे शौचालय बांधणे
खूप महत्वाचे आहे असेही त्यांनी गावकऱ्यांना पटवून दिले.
गटविकास अधिकारी श्री.मोकाटे म्हणाले की, अंजनवती हे गाव
हागणदारीमुक्त होण्यासाठी स्वयंप्रेरीत होऊन हागणदारीमुक्तीमध्ये सहभागी झाल्यामुळे
आपले अभिनंदन करतो. उघड्यावर शौचास गेल्याने होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी प्रत्येकाने
शौचालय बांधण्यास प्राधान्य देवून गाव हागणदारीमुक्त करावे तसेच जर कोणी उघड्यावर शौचास
जात असेल तर त्यांना दंड करण्यात यावा असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमात उत्कृष्ट काम केल्याबाबत गावकऱ्यांनी ग्रामसेवकाचे
कौतूक केल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.ननावरे यांनी अंजनवतीचे ग्रामसेवक आर.डी.
हावळे यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. सर्वप्रथम श्री.ननावरे यांनी श्री गणेशाची
आरती केली. या कार्यक्रमास गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा