सोमवार, १५ ऑगस्ट, २०१६

खोकरमोहाच्या ग्रामसभेत खुद्द ग्रामविकासमंत्री ! प्रत्येक गाव विकासाच्या क्षेत्रात अग्रेसर होईल - पालकमंत्री पंकजा मुंडे ग्रामसभेत केले मार्गदर्शन






बीड, दि. 15 :-  ग्रामीण भागाच्या विकासाला राज्य शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असून येत्या काळात राज्यातील प्रत्येक गाव विकासाच्या अनेक क्षेत्रात अग्रेसर राहणार आहे. यासाठी ग्रामस्थ आणि ग्रामसभेने पुढाकार घेण्याची गरज आहे असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बाल कल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी केले.
शिरुर कासार तालुक्यातील खोकरमोहा येथे ग्रामपंचायतने आयोजित केलेल्या ग्रामसभेत राज्याच्या ग्रामविकास व महिला बालकल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी उपस्थित राहून सहभाग घेतला. यावेळी ग्रामसभेला संबोधित करताना त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, पंचायत समिती सभापती मंडाबाई केदार, उपसभापती जालिंदर सानप, सरपंच संगीता मिसाळ आदि मान्यवर तसेच ग्रामस्थ महिला-पुरुष उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देवून पालकमंत्री पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, मुलींचा जन्मदर वाढावा आणि मुलींना सन्मानाचे स्थान देण्यासाठी माझी कन्या भाग्यश्री ही योजना राज्यात राबविली जात आहे. या योजनेचे श्रेय खऱ्या अर्थाने बीड जिल्ह्याला आहे. बीड जिल्ह्यात मुलींच्या जन्माचे प्रमाण कमी आहे. ते वाढविण्यासाठी जनजागृतीची गरज असून प्रत्येकाने पुढाकार घेतल्यास मुलींच्या जन्माचे स्वागत होईल आणि समाजातील मुलींच्याविषयी नकारात्मक मानसिकता दूर सारता येईल. गावातील दारुबंदीच्या निर्णयाचे स्वागत करुन त्या पुढे म्हणाल्या की, पाण्याचा दुष्काळ निवारणासाठी जलयुक्त शिवार सारख्या योजनांची फलश्रृती कौतूकास्पद आहे. जलसंधारणाच्या या मोहिमेचे यश हे ग्रामस्थांच्या सक्रीय सहभागातच आहे. शाळेच्या इमारतीसाठी मागणी केलेला निधी आणि ग्रामीण रस्ते सुधारणांसाठी निधी उपलब्ध करुन देण्याची घोषणाही त्यांनी ग्रामसभेत केली.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची माहिती देवून पालकमंत्री मुंडे पुढे म्हणाल्या की, ग्रामविकासाच्या नवनवीन योजना आखून त्या राबवून सर्व गावे समृध्द करण्याचा आमचा निर्धार आहे. अंतर्गत रस्ते, पाणी पुरवठा,शाळा, पुशवैद्यकीय, आरोग्य सेवा यासारख्या सर्व क्षेत्रात गावे स्मार्ट करण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम राज्यात राबविण्यात येत आहे.
प्रारंभी माजी सरपंच वैजनाथ मिसाळ यांनी प्रास्ताविक केले. ग्रामसेवक बाळू जायभाये यांनी ग्रामसभेची विषयपत्रिका सांगून ग्रामसभेचे रितसर कामकाज सुरु केले. ग्रामपंचायत सदस्य सुधाकर मिसाळ यांनी गावात दारुबंदीचा ठराव मांडला. ग्रामस्थांनी त्याला अनुमोदन दिले.
जिल्ह्यातील विकासाची दिशा गेल्या दोन वर्षात अधिक  प्रभावीपणे स्पष्ट होत असल्याचे सांगून जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले की, महिला-पुरुष समानता समाजात आवश्यक असून महिलांच्या हातात आता मोठ्या प्रमाणात अधिकार आल्यामुळे गावाचा समतोल आणि प्रभावी विकास होण्यास मदत होत आहे. गावाचा कायापालट करण्यासाठी गावाला आलेल्या विकास निधीबाबत अधिक जागरुक राहून ग्रामस्थांनी सकारात्मक पुढाकार घेतला पाहिजे. शासनाच्या निधीचा अपहार करणाऱ्या व दुरुपयोग करणाऱ्यांविरुध्द ग्रामस्थांनी दक्ष रहावे आणि चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी सदैव रहावे असेही ते म्हणाले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांनी यावेळी ग्रामीण विकासाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती दिली. पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांची यादी तयार करण्यापासून ते गावाच्या विकासासाठी तयार करावयाच्या आराखड्यापर्यंतची कामे ग्रामपंचायत व ग्रामसभेने निश्चित करुन पूर्ण केली पाहिजेत असे सांगून त्यांनी शिरुर तालुक्याने स्वच्छता कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा असे आवाहन केले.

यावेळी शाळेची पाहणी करुन पालकमंत्री मुंडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनीही उत्स्फुर्तपणे ग्रामसभेत आपली मते मांडली. या कार्यक्रमास गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा