रविवार, १४ ऑगस्ट, २०१६

परळी तालुक्यातील एकही गाव अंतर्गत रस्त्यांशिवाय राहणार नाही - पालकमंत्री पंकजा मुंडे






          बीड, दि. 14 :- परळी वैजनाथ मतदारसंघाची लोकप्रतिनिधी या नात्याने परळी तालुक्यातील एकही गाव अंतर्गत रस्त्यांशिवाय राहणार नाही अशी निसंदिग्ध ग्वाही राज्याच्या ग्रामविकास व महिला व बालकल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
          परळी तालुक्यातील रामनगर तांडा येथील 25-15 मुलभूत सुविधांच्या निधीतून 8 लाख 50 हजार रुपयांचा सभागृह आणि 3 लाख रुपयांचा अंतर्गत रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन पालकमंत्री मुंडे यांच्या हस्ते झाले यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, जिल्हा परिषद सदस्य वृक्षराज निर्मळ आदि मान्यवर उपस्थित होते.
          ग्रामीण भागाच्या विकासासाठी ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून नाविण्यापूर्ण योजना राबविण्यात येत असून येत्या काळात ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलणार आहे. प्रत्येक गावाच्या सर्वांगीन विकासाचा आराखडा ग्रामस्थांच्या संकल्पनेतून तयार केला जात असून थेट गावांना विकासाचा निधी मिळणार आहे. यामुळे भविष्यात गावे अधिक स्मार्ट होणार असल्याचे पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या.
          रामनगर तांडा या छोट्या लोकवस्तीच्या गावातील ग्रामस्थांडून विविध विकास कामांच्या अपेक्षेबरोबरच वाचनालय सुरु करण्याची मागणी अत्यंत कौतूकास्पद असल्याचे सांगून पालकमंत्री मुंडे यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले जातील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी बंजारा महिलांनी त्यांना पारंपरिक पामडी घालून केलेला सत्कार हा अविस्मरणीय असल्याचे सांगून त्यांनी रामनगर तांड्याच्या विकासासाठी आपण कायम कटिबध्द राहू अशी भावना व्यक्त केली.
          या समारंभास पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच, सदस्य, पदाधिकारी, ग्रामस्थ आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.

          रामेवाडी येथील जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागामार्फत जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत बांधलेल्या सिमेंट नाला बंधाऱ्याचे जलपूजन यावेळी पालकमंत्री मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा