बुधवार, २० फेब्रुवारी, २०१९







         शासनाच्या निर्णयांमुळे सर्वसामान्य ग्रामीण भागाची विकासाकडे वाटचाल
                                                       - पालकमंत्री पंकजा मुंडे
          बीड,दि,20 :- ग्रामीण विकासाला प्राधान्य देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना देखील सक्षम करण्यासाठी योजनांची अंमलबजावणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतल्याने महिला, शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेचे जिवनमान उंचावून ग्रामीण भागाची विकासाकडे वाटचाल सुरु आहे, असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
          माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील तीर्थक्षेत्र विकास योजनेतून सिमेंट रस्त्यांची कामे व मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेच्या कामांचा शुभारंभ श्रीमती मुंडे यांच्या हस्ते झाला यावेळी त्या बोलत होत्या.या कार्यक्रमासाठी आ.आर.टी.देशमुख,राहूल लोणीकर,डॉ. ओमप्रकाश शेटे, विजय गोल्हार, रमेश आडसकर, मोहन जगताप, सरपंच ज्योती ठोंबरेआदी उपस्थित होते.  
          यावेळी श्रीमती मुंडे म्हणाल्या की, राज्यातील ग्रामीण व कृषी विकासासाठी प्राधान्य देताना शासनाने अनेक निर्णय घेतले याचाच परिणाम दुष्काळी परिस्थितीत सुध्दा कमी पाऊस झालेल्या ठिकाणी आजही जलसाठे आहेत. जलयुक्त शिवार कामाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 36 जिल्हयातील शेताच्या बांधावर पोहचले आहेत. याचबरोबर शासनाने अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोठे निर्णय घेतले, यामध्ये मराठा समाजाला आरक्षण,ग्रामीण भागातील सिचंन विकास, रस्ते विकास व प्रगतीची अनेक कामे सुरु आहेत.
          त्या म्हणाल्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला दिलासे देणारे निर्णय घेताना जिल्हयासाठी 616 कोटी रुपये दुष्काळाचे खरीप अनुदान केंद्राने मंजूर केले असून त्यातील 125 कोटी रुपये प्राप्त झाले. दुष्काळाची परिस्थिती असली तरीही पीकविमा, खरीप अनुदान, कर्जमाफीच्या माध्यमातून मोठा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे.
          यावेळी बोलताना श्रीमती मुंडे म्हणाल्या की, दिद्रुंडच्या विकासासाठी 1 कोटी 68 लाख रुपयांची पेयजल योजना, 93 लाख रुपयांचे ग्रामपंचायत हद्दीतील सिमेंट रस्ते या कामांच्या शुभारंभाचे माझ्या हस्ते भूमिपूजन झाले आहे. याचबरोबर 2 कोटी 60 लाख रुपये तेलगाव ते दिंद्रुड रस्त्यासाठी मंजूर करताना 4 कोटी 66 लाख रुपये माजलगाव तालुक्यातील ग्रामीण रस्ते विकासासाठी दिले. यासारखी असंख्य कामे सुरु केली आहेत. बीड जिल्हयात जलस्त्रोतांचे बळकटीकरणाचे मोठे काम झाले त्याचा राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळून गौरव झाला. गावांच्या विकासासाठी अंगणवाडी,रस्ते,स्मशानभूमी आदी कामे ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून झाले असे ग्रामविकास मंत्री श्रीमती मुंडे यांनी सांगितले.
          आ.श्री देशमुख म्हणाले, ग्रामीण भागाचा विकास हा सद्याच्या केंद्र व राज्य शासनाचा प्राधांन्याचा विषय आहे आणि पालकमंत्री पंकजाताईच्या माध्यमातून बीड जिल्हयाच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध झाला आहे त्याचा फायदा ग्रामीण जनतेला होत आहे.
                    डॉ. शेटे म्हणाले ग्रामीण भागात प्राधान्यांसह विकासाची अनेक कामे राज्यशासनाने केली आहेत. भविष्यातील विकासासाठी पेयजल योजना, रस्ते विकास,उद्याने आदींसाठी मोठा निधी दिला आहे. यावेळी श्री. राहूल लोणीकर, श्री.बियाणी,श्री.अडसकर आदींनी विचार व्यक्त केले. याप्रसंगी मंत्री महोदयांच्या हस्ते दिंद्रुड ग्रामपंचायत क्षेत्रातील विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
अंबाजोगाई तालुक्यातील पुस येथे विकास कामांचा शुभारंभ
       मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पुस व 20 खेडी पाणीपुरवठा योजनांचा पुर्नरुज्जीवन कामांचा शुभारंभ झाला. यावेळी आ.संगिता ठोंबरे, श्री. व्ही.बी. जगतारे,नेताजी देशमुख,गयाबाई कऱ्हाड,गणेश कऱ्हाड आदी उपस्थित होते. पूस व 20 खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचे पुर्नरुज्जीवन करण्यासाठी शासनाने 7 कोटी 44 लाख रुपये तसेच पट्टीवडगाव 9 खेडी पाणीपुरवठा योजनेसाठी 2 कोटी 12 लाख रुपये मंजूर केले आहेत. याविकास कामांच्या माध्यमातून ग्रामीण भागासाठी शाश्वत पाणीपुरवठा होण्यास मदत मिळणार आहे.
*-*-*-*-*-*-*


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा