मंगळवार, १८ डिसेंबर, २०१८


फरदड कापुस मुक्त गाव अभियान जिल्हाभरात राबविण्यात यावे
बीड दि. 18 :- फरदड कापुस अभियानाअंतर्गत जिल्हास्तरावर व्यापक प्रमाणात मोहिम राबविण्यात येत आहे. बीड जिल्हयामधे कापुस पिकाचे 3.29 लाख हेक्टर क्षेत्र आहे. खरीप हंगाम 2018 मध्ये बीड जिल्हयात 3.77 लाख हेक्टर क्षेत्रावर कापुस पिकाच्या बी.टी वाणाची लागवड करण्यात आलेली आहे. शेंदरी बोंड अळीमुळे  कापुस पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. बोंड अळीचा संपर्ण नायनाट करण्यासाठी शेतकऱ्यांनी फरदड घेऊ नये आणि आपल्या शेतातील पऱ्हाटी मुळासहित उपटुन काढावी व किडग्रस्त बोंडे, नख्या इत्यादी अवशेषांचा संपुर्ण नायनाट करावा, असे अवाहन जिल्हा कृषि अधिक्षक एम.एल. चपळे यांनी केले आहे.डिसेंबर महिन्यात रात्रीच्या वातावरणात घट होत असल्याने व रात्रीच्या कालावधी वाढत असल्याचे गुलाबी बोंड अळीच्या पतंगाना उपजिविकेसाठी अनुकुल वातावरण ठरत आहे. त्यामुळे सद्याच्या परिस्थितीत गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन पुढील प्रमाणे करणे अत्यंत गरजेचे आहे.
            त्यामध्ये कामगंध सापळयाचा सामुहिकरीत्या वापर करुन मोठया प्रमाणात नर पंतग पकडण्याची मोहिम हाती घेतल्यास गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी होईल तसेच जिनींग, प्रेसिंग मिल मध्ये कापुस साठवणीच्या ठिकाणी कामगंध सापळे (फेरोमन ट्रॅप्स) लावावेत. या कामगंध सापळयातील ल्युर्स वेळोवेळी बदलून नवीन ल्युर्स लावावेत. तसेच 15-20 कामगंध सापळयाचा वापर करुन एकत्रितरित्या गुलाबी बोंडअळीचे पतंग गोळा करुन नष्ट करावेत.पुढील हंगामातील प्रादुर्भाव थांबविण्यासाठी गुलाबी बोंडअळी डिसेंबर महिन्यात कपाशीच्या पऱ्हाटया किंवा वाळलेल्या नख्यामध्ये गुलाबी बोंडअळी सुप्त अवस्थेत जाण्याची शक्यता असते. अशा वेळी कपाशीचे शेतातील अवशेष नष्ट करणे आवश्यक आहे. तसेच डिसेंबर नंतर कपाशीचे पिके ठेवल्याने गुलाबी बोंडअळीच्या वाढीसाठी कपाशीची बोंडे सतत उपलब्ध होत असल्याने तीच्या वाढीच्या अवस्थेत आणखी चालना मिळून अळीच्या जीवनक्रमांच्या संख्येत कमी कालावधीत वाढ होऊन बी-टी प्रथीनांचे प्रमाण कमी होऊन प्रतिकारक शक्ती निर्माण होते.
            डिसेंबर महिण्यानंतर शेतात 5 ते 6 महिणे कापूस पीक विरहीत ठेवल्यास गुलाबी बोंडअळीचा जीवनक्रम संपुष्टात येतो. त्यामुळे पुढील हंगामात गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भाव कमी होतो. डिसेंबर नंतर खाद्य उपलब्ध नसल्यास अळी सुप्त अवस्थेत जाते. परंतु फरदडीमुळे जीवनक्रम चालू राहुन पुढील हंगामात लागवड करण्यात येणाऱ्या कापसावर तिचा पुन्हा प्रादुर्भाव होतो म्हणुन कुठल्याही परिस्थितीत फरदड घेऊ नये. कापुस पिकाच्या चुरा करणारे श्रेडर यंत्राचा वापर करावा व कापूस पिकाच्या अवशेषांचा चुरा गोळा करुन सेंद्रीय खतांमध्ये रुपांतरीत करावा. पीक काढणीनंतर खोल नांगरणी करुन जमिन उन्हात तापू द्यावी. पीक काढणीनंतर कपाशीच्या पऱ्हाटया, व्यवस्थीत न उघडलेली किडग्रस्त बोंडे व पाला पाचोळा नष्ट करुन शेत स्वच्छ ठेवावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.********

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा