सोमवार, ६ नोव्हेंबर, २०१७

मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर
केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन
कामे वेळेत पार पाडण्याची दक्षता घ्यावी
                        -जिल्हाधिकारी एम.डी.सिंह
          बीड, दि.4 :- भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2017 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम-2018 घोषित केला असून विशेष मोहिमेमध्ये केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी घरोघरी प्रत्यक्ष भेटी देऊन कामे वेळेत पार पाडण्याची दक्षता घ्यावी. असे निर्देश जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिले.
            जिल्हाधिकारी कार्यालयात 15ते 30 नोव्हेंबर 2017 कालावधीतील  विशेष मोहीमेबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र वाघ यांची प्रमुख उपस्थित होती.
            कार्यक्रमानूसार प्रारुप मतदार यादी दि.3 ऑक्टोबर 2017 रोजी प्रसिध्द केली आहे. दावे व हरकती दि.3 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2017 या कालावधीत स्विकारण्यात येतील. दि.8 व 22 आणि 29 ऑक्टोबर 2017 या तीन दिवशी विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. बीएलओ मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी दि.15 ते 30 नोव्हेंबर 2017 कालावधीत घरोघरी भेटी देऊन पडताळणी व नोंदणी करणे आणि अंतिम मतदार यादी दि.5 जानेवारी 2018 रोजी प्रसिध्द करण्यात येईल. असे विशेष पुनरिक्षण कार्यक्रमातील महत्वाचे टप्पे आहेत.
            विशेष मोहिमेमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी दि.15 ते 30 नोव्हेंबर 2017 या कालावधीतील घरोघरी भेटी देऊन पात्र मतदारांची जास्तीत जास्त नोंदणी करणे, पूर्वीच्या पुनरिक्षण कार्यक्रमात नाव नोंदणीपासून वंचित राहिलेल्या पात्र नागरिकांना (1 जानेवारी 1999 अथवा त्यापूर्वी जन्म झालेल्या मतदारांना) नमूना क्र.6चे वाटप करणे व परिपूर्ण भरलेले अर्ज परत घेणे. 2018 च्या पुनरिक्षणासाठी पात्र  नागरिकांना (2 जानेवारी 1999 आणि 1 जानेवारी 2000 यामध्ये जन्म झालेल्या मतदारांना) नमूना क्र.6 चे वाटप करणे व त्यांनी भरलेले अर्ज परत घेणे. मतदार नोंदणीसाठी पात्र होणाऱ्या नागरिकांची माहिती जमा करणे. स्थलांतरीत  व मयत मतदारांच्या वगळणीसाठी नमूना क्र.7 चे वाटप करणे व जमा करणे. प्रारुप मतदार यादीतील तपशीलात दुरुस्तीसाठी न.क्र.8 चे वाटप करणे व जमा करणे. प्राप्त झालेल्या अर्जाची बीएलओ चेकलिस्टप्रमाणे प्रत्यक्ष जायमोक्यावर जाऊन तपासणी करणे. मतदार ओळखपत्र दुरुस्तीसाठी इपीआयसी 001 अर्ज मतदारांना देऊन भरुन घेणे. मतदारांची कौटूंबिक माहिती व मोबाईल क्रमांक व दूरध्वनी क्रमांक गोळा करणे. मोबाईल आज्ञावलीचा वापर करुन मतदारांच्या घरांचे अक्षांश व रेखांश गोळा करणे अथवा अक्षांश व रेखांशाचे एसएमएस करणे.
            अनिवासी भारतीय नागरिकांची माहिती संबंधित कुटुंबाकडून प्राप्त करुन घेणे. मतदारांचे मोबाईल क्रमांक व दूरध्वनी क्रमांक गोळा करणे. दूबार मतदारांना सूचना बजावणी करणे व पंचनामा करणे. कृष्णध्वल छायाचित्र असलेल्या मतदारांचे मतदार यादीत मतदार छायाचित्र उपलब्ध्‍ा नाहीत अशा मतदारांचे नजीकच्या काळातील 3.5×2.5 साईजचे 75 टक्के चेहऱ्याचा भाग व दोन्ही कान दिसावेत अशाप्रकारचे छायाचित्र मतदारांकडून प्राप्त करुन घेणे. आदि महत्वाची कार्ये करण्यात येणार आहेत. या बैठकीस उपविभागीय अधिकारी महेंद्रकुमार कांबळे, शिवकुमार स्वामी यांच्यासह सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी यांच्यासह विविध यंत्रणेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

-*-*-*-*-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा