सोमवार, २८ ऑगस्ट, २०१७

संवादपर्व उपक्रम नागरिकांनी जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे - जि.प.अध्यक्षा सविता गोल्हार

संवादपर्व उपक्रम
नागरिकांनी जिल्हा हागणदारीमुक्त
करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे
                       - जि.प.अध्यक्षा सविता गोल्हार

बीड, दि. 28 :- जिल्हा हागणदारीमुक्त न झाल्यास येणाऱ्या काळात शासनाच्या विविध विकास योजनेच्या लाभापासून वंचित रहावे लागणार असल्यामुळे प्रत्येक नागरिक, गावासह जिल्ह्याच्या विकासावर परिणाम होणार आहे त्यासाठी जिल्ह्यातील पदाधिकारी, नागरिकांनी शौचालय बांधून जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार यांनी केले.
बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात  जिल्हा परिषद आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने संवादपर्व कार्यक्रमांतर्गत आयोजित स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) "खुले में शौच से आझादी " व पंचायत संमेलन कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा जयश्री मस्के, समाज कल्याण सभापती संतोष हांगे, शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला, उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी, डॉ.सुनिल भोकरे, मधूकर वासनिक,  जि.प.सदस्य श्रीमती रेखा क्षीरसागर, श्रीमती ओव्हाळ, शिवाजी पवार, जयसिंह सोळंके यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना जि.प.अध्यक्षा श्रीमती गोल्हार म्हणाल्या की, उघड्यावर शौचास गेल्याने होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी प्रत्येकाने शौचालय बांधण्यास प्राधान्य देवून गाव हागणदारीमुक्त करावे. समाजातील प्रत्येक घटकाने आपण समाजाचे काही देणे लागतो या दृष्टीकोनातून शौचालय बांधण्यासाठी आपल्या परिसरातील व्यक्तींना प्रवृत्त करावे जेणेकरुन आपला जिल्हा 100 टक्के हागणदारीमुक्त होईल. निरोगी असल्यास विकासाच्या योजनेचा अनुभव घेण्यासाठी शौचालय व स्वच्छतेचे काम केले पाहिजे. तसेच निरोगी जीवन जगण्यासाठी आपले गाव, परिसर व जिल्हा स्वच्छ झाला पाहिजे यासाठी नागरिकांसह पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. असे सांगून जिल्हा 2 ऑक्टोबरपर्यंत 100 टक्के हागणदारीमुक्त होण्यासाठी प्रशासनाबरोबरच पदाधिकारी तसेच ग्रामस्थांनी या स्वच्छ भारत मिशनमध्ये सहभाग नोंदवावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला म्हणाले की, जिल्हा 100 टक्के हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येत असून जिल्ह्यात 60 गुड मॉर्निंग पथके नेमण्यात आली असून या पथकाच्या माध्यमातून जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी ग्रामीण भागासह प्रत्येक गावातील नागरिकांना शौचालयाचे महत्व व उघड्यावर शौचास गेल्यास दंडात्मक कारवाईची माहिती देण्यात येत असून जिल्ह्यातील दोन तालुके हागणदारीमुक्त झाले आहेत. येणाऱ्या काळात ज्या कुटुंबाकडे शौचालय नाही अशा कुटुंबांना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळणार नसल्याने नागरिकांनी शौचालय बांधून त्याचा नियमित वापर करावा. जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी   लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना यांनीही आपला सहभाग नोंदवावा. शौचालय बांधकाम करण्यासाठी शासनाकडून 12 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यात येत असून तसेच रोजगार हमी योजनेच्या माध्यमातूनही शौचालय बांधकाम करता येणार असल्याने याचाही लाभ नागरिकांनी घ्यावा असे सांगून जिल्ह्यात दररोज पूर्ण झालेल्या शौचालयाची ऑनलाईन नोंदणी करण्याचे काम संबंधितांनी वेळेवर करावेत. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी युनिसेफचे वरिष्ठ सल्लागार जयंत देशपांडे यांनी स्वच्छ भारत मिशनबाबत सविस्तर माहिती देताना जिल्हा हागणदारीमुक्त होण्यासाठी सर्व स्तरावरुन जनजागृती होणे गरजेचे असून स्वच्छ भारत मिशन हे राष्ट्रीय कार्यक्रम असून मार्च 2018 पर्यंत राज्य हागणदारीमुक्त करण्याचे नियोजन असल्याने प्रत्येक जिल्हा हागणदारीमुक्त झाला तरच राज्य हागणदारीमुक्त होईल असे सांगून उघड्यावर शौचास गेल्यास नागरिकांना अनेक दुष्परिणामांना सामोरे जावे लागत असल्याने सर्वांनी अस्वच्छता दूर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत तसेच शासकीय यंत्रणा, पदाधिकारी व स्थानिक ग्रामस्थांच्या माध्यमतून गाव, जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती संतोष हांगे, शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख, जि.प.सदस्य अशोक लोढा, गटविकास अधिकारी संजय केंद्रे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधूकर वासनिक यांनी या कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट करुन जिल्ह्यात सुरु असलेल्या हागणदारीमुक्तीच्या कामाविषयी माहिती विशद केली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुनिल भोकरे यांनी मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे वाचन केले. प्रारंभी कार्यशाळेची सुरुवात मान्यवराच्या हस्ते दिप प्रज्वलनाने करण्यात आली.  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतोष वाघमारे यांनी केले. या कार्यक्रमास जि.प.पं.स.सभापती, जि.प.पं.स.सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-*-*-*-*-





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा