बीड, दि. 3 :- प्रत्येक वर्षी एप्रिल, मे, जून या महिन्यामध्ये
उष्माघाताचा प्रादुर्भाव होत असतो. तसेच त्यामुळे मृत्यूही होणे संभवनीय असते. महाराष्ट्रात
विदर्भ व मराठवाड्यात उष्माघात प्रादुर्भाव प्रामुख्याने आढळून येतो. उष्माघाताने मृत्यू
होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय व उपचार करण्याचे आवाहन करण्यात येते.
उष्माघात होण्याची कारणे उन्हाळ्यामध्ये
शेतावर अथवा इतर मजुरीची कामे फार वेळ करणे, कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम करणे,
काच कारखान्यातील कामे करणे, जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे, घट्ट कपड्यांचा
वापर करणे अशा प्रत्यक्ष अथवा तापमानातील वाढत्या
परिस्थितीशी सतत संबंध येण्याने उष्माघात होतो.
उष्माघाताची लक्षणे थकवा येणे,
ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे,
पोटऱ्यात वेदना येणे अथवा पेंडके येणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बैचेनी व अस्वस्थता,
बेशुध्दावस्था येणे ही आहेत.
वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची
कामे करणे टाळावे. कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असताना करावीत.
उष्णता शोषून घेणारे कपडे (काळ्या किंवा भडक रंगाचे) वापरु नयेत. सैल, पांढऱ्या रंगाचे
कपडे वापरावेत. जलसंजीवनीचा वापर करावा. भरपूर पाणी प्यावे. सरबत प्यावे. अधूनमधून
उन्हामध्ये काम करणे टाळावे व सावलीत विश्रांती घ्यावी. वरील लक्षणे सुरु होताच ताबडतोब
उन्हात काम करणे थांबवावे व उपचार सुरु करावा. उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, डोक्यावर
टोपी, टॉवेल, फेटा, उपरण यांचा वापर करावा याप्रमाणे प्रतिबंधात्मक उपाय करावेत.
उष्माघात झाल्यास रुग्णालस वातानुकूलित
खोलीत ठेवावे अथवा हवेशीर खोलीत ठेवावे, खोलीत पंखे, कुलर ठेवावेत. रुग्णाचे तापमान
खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. रुग्णास थंड पाण्याने आंघोळ घालावी. रुग्णाच्या
कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात, ऑईस पॅक लावावा. आवश्यकतेनूसार सलाईन द्यावी
आदि उपचार करावेत. असे बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा