बुधवार, १२ एप्रिल, २०१७

तंबाखू नियंत्रणासाठी जिल्हा रुग्णालयात समुपदेशन कक्ष व औषधोपचार सुरु



       बीड, दि. 12 :- राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातंर्गत बीड जिल्ह्यातील लहान मुले, तरुण आणि प्रौढ व्यक्ती तंबाखूजन्य पदार्थाच्या व्यसनापासून दुर राहण्यासाठी तंबाखू नियंत्रण कक्ष बीड येथील जिल्हा रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागातील खोली क्रमांक 12 मध्ये सुरु करण्यात आला आहे. या कक्षामध्ये तंबाखू जन्य पदार्थाच्या सेवनापासून व्यक्ती अलिप्त राहावा या दृष्टीकोनातून तंबाखू सेवन करणाऱ्यांना समुपदेशन करणे, समुपदेशन पध्दतीवर व्यक्तीचा विश्वास निर्माण होण्यासाठी व्यक्तीने दिलेली माहिती गोपनीय ठेवणे, समस्याग्रस्त व्यक्तीच्या प्रत्येक पायरीचे मुल्यांकन करुन नोंदी ठेवणे, व्यक्तीला तंबाखूच्या सेवनापासून दुर ठेवण्यासाठी पाठपुरावा करणे, तंबाखू मुक्तीसाठी औषधोपचार करणे अशा अनेक उपायासह तंबाखु सोडण्यासाठी मदत केली जात आहे. सर्व सुविधा या रुग्णालयात मोफत उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तंबाखु नियंत्रण कार्यक्रम अधिकारी डॉ.सत्येंद्र दबडगांवकर यांनी तंबाखू नियंत्रण संदर्भात पुणे, मुंबई येथे प्रशिक्षण घेतले असून तंबाखू मुक्तीसाठी त्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच समुपदेशक कृष्णा शेंडगे (भ्रमणध्वनी 9923092337) व सामाजिक कार्यकर्ता सुरेश दामोधर (भ्रमणध्वनी 9545878497) यांच्याशी संपर्क साधावा तसेच बीड जिल्ह्यातील जास्तीत जास्त जनतेने उपलब्ध करुन देण्यात आलेल्या सुविधेचा फायदा घेवून जिल्हा तंबाखू मुक्त करण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा