बीड,
दि.7 :- अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहामध्ये
प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन,
निवास व इतर शैक्षणिक सुविध विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक ती
रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट उपलब्ध करण्यासाठी
शासनाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केली आहे. पात्र विद्यार्थ्यानी
आपले अर्ज दि.16 मार्च 2017 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, बीड येथे
सादर करावेत असे आवाहन करण्यात येत आहे.
योजनेचा लाभ सन 2016-17 या वर्षामध्ये
इयत्ता इयत्ता 11 वीचे विद्यार्थी, इयत्ता 12 वीचे विद्यार्थी आणि 12 वी नंतर प्रथम वर्ष पदविका, पदवीचे विद्यार्थी आणि
प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या पदव्युत्तर पदवी, पदवीकाच्या विद्यार्थ्यांना हा लाभ
दिला जाणार आहे. तसेच सन 2017-18 पासून पुढे हा लाभ इयत्ता 11 वी व 12 वीचे विद्यार्थी
आणि 12 वी नंतर प्रथम वर्ष पदविका, पदवी व पदव्युत्तर पदवीका या पदवीच्या विद्यार्थ्यांना
सुध्दा हा लाभ दिला जाणार आहे. शासन निर्णयातील तरतूदीप्रमाणे या योजनेमध्ये दिव्यांग
विद्यार्थ्यांसाठी 3 टक्के आरक्षण असेल व त्यांच्या पात्रतेची किमान टक्केवारी 50 टक्के
राहील. हा दिव्यांग विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील असावा. दिव्यांग
विद्यार्थी वगळता इतर विद्यार्थ्यांसाठी किमान 60 टक्के इयत्ता 10वी, 12वी मध्ये गुण
असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे.
विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थ्यांने
स्वत:च्या नावाने बँक खाते उघडणे व आपल्या आधार क्रमांकाशी संलग्न करणे अनिवार्य आहे.
स्थानिक विद्यार्थ्यांस हा लाभ दिला जाणार नाही. शासन निर्णयातील तरतूदीप्रमाणे विद्यार्थी
इयत्ता 10 वी किंवा 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेशित असावा व त्यास कोणत्याही
शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश मिळालेला नसावा. इयत्ता 11 वी मध्ये प्रवेश घेतलेल्या
विद्यार्थ्यास इयत्ता 10 वी मध्ये किमान 60 टक्के गुण असणे अनिवार्य असेल, त्यापेक्षा
कमी गुण असणारा विद्यार्थी या लाभास पात्र होणार नाही. इयत्ता 12 वी नंतर प्रवेश घेतलेला
पदवी, पदवीका अभ्यासक्रम हा दोन वर्षापेक्षा कमी कालावधीचा नसावा. तसेच पदवी नंतर पदव्युत्तर पदवी, पदवीका अभ्यासक्रम सुध्दा दोन
वर्षापेक्षा कमी कालावधीचा नसावा. शासकीय वसतिगृहातील प्रचलित नियमाप्रमाणे इयत्ता
10 वी, 12 वी, पदवी नंतरच्या अभ्यासक्रमासाठी केवळ प्रथम वर्षात प्रवेश घेतलेला विद्यार्थीच
या योजनेच्या लाभास अनुज्ञेय आहे. विद्यार्थ्याने
प्रवेश घेतलेले महाविद्यालय आणि प्रवेश घेतलेला अभ्यासक्रम हा राज्य शासन, अखिल भारतीय
तंत्रशिक्षण परिषद, भारतीय वैद्यकिय शिक्षण परिषद, वैद्यकिय परिषद, भारतातील फार्मसी
परिषद, वास्तुकला परिषद, कृषि परिषद, महाराष्ट्र
तंत्रशिक्षण परिषद वा तत्सम सक्षम प्राधिकारी यांच्यामार्फत मान्यता प्राप्त असणे बंधनकारक
आहे. विद्यार्थ्यांची निवड झाल्यानंतर त्याला प्रत्येक वर्षी 60 टक्के पेक्षा जास्त
गुण घेणे अनिवार्य आहे. अर्ज http://mahaeschol.maharashtra.gov.in,http://maharashtra.gov.in,http://sjsa.maharashtra.gov.in
या संकेतस्थळावर किंवा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात उपलब्ध आहेत. विद्यार्थी
अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील असावा. सन 2016-17 या वर्षी केवळ इयत्ता 11 वी
मध्ये प्रवेश घेतलेला विद्यार्थी आणि पदवी, पदवीका व पदव्युत्तर पदवीसाठी प्रथम वर्षासाठी
प्रवेश घेतलेला विद्यार्थीच अर्ज करण्यास पात्र असेल. या योजनेअंतर्गत लाभास पात्र
असलेल्या विद्यार्थ्यांस भारत सरकार शिष्यवृत्ती अंतर्गत निर्वाह भत्ता अनुज्ञेय राहणार
नाही.व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न निर्वाह भत्ता या योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना
ही योजना अनुज्ञेय होणार नाही.
अर्जासोबत विद्यार्थ्यांचा
जातीचा दाखला. महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा पुरावा (वय/अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र/रेशनकार्ड/निवडणूक
ओळखपत्र/जन्म तारखेचा दाखला/शाळा सोडल्याचा दाखला यापैकी एक). आधारकार्डची प्रत. बँकेत
खाते उघडल्याचा पुरावा म्हणून पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत किंवा बँक स्टेटमेंटची
प्रत. तहसीलदारापेक्षा कमी दर्जा नसलेल्या महसूल अधिकारी यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र
किंवा वडिल नौकरीत असल्यास फॉर्म नं.16. विद्यार्थी दिव्यांग असल्यास त्याबाबतचे सक्षम
अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र. इयत्ता 10 वी, 12 वी किंवा पदवी परीक्षेचे गुणपत्रक. महाविद्यालयाचे
बोनाफाईड प्रमाणपत्र. विद्यार्थीनी विवाहीत असल्यास पतीच्या उत्पनाचा पुरावा. बँक खाते
आधार क्रमांकाशी संलग्न केल्याबाबत पुरावा. विद्यार्थ्यांने कोणत्याही शासकीय वसतिगृहाज
प्रवेश घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र. स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र. विद्यार्थी
सध्या जेथे राहतो त्याबाबतचा पुरावा (खाजगी वसतिगृह, भाडे करारनामा इत्यादी). महाविद्यालयाचे
उपस्थिती प्रमाणपत्र. सत्र परीक्षेच्या निकालाची प्रत आदि कागदपत्रासह अर्ज करावा.
असे बीडचे समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा