बुधवार, १ फेब्रुवारी, २०१७

शहीद जवान विकास समुद्रे यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार











बीड, दि. 1 :- काश्मीर येथे हिमस्खलनामुळे शहीद झालेल्या भारतीय सैन्य दलाच्या जवान विकास पांडुरंग समुद्रे यांच्यावर त्यांच्या मुळगावी बीड जिल्ह्यातील गांजपूर ता.धारुर येथे शासकीय इतमामात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
शहीद विकास समुद्रे हे सैन्य दलाच्या मुळ युनिट 18 महार रेजिमेंटमध्ये व सध्या 51 राष्ट्रीय रायफल्समध्ये कार्यरत होते. जम्मू काश्मीर मधील गुरज भागात अतिरेकी घुसखोरीवर नियंत्रण ठेवण्याकरीता तैनात करण्यात आले होते. 25 जानेवारी रोजी अचानक झालेल्या हिमस्खलनामध्ये सापडून शहीद झाले आहेत. त्यांचे पार्थिव गुरेज सेक्टर येथून श्रीनगर मिलिटरी हॉस्पीटल येथे हेलिकॉप्टरने 30 जानेवारी सायंकाळी आणण्यात आले. श्रीनगर येथून दिल्ली, दिल्लीहून विमानाने पुणे आणि आज सकाळी पुण्याहून हेलिकॉप्टरने धारुर आणि तेथून त्यांच्या मुळगावी गांजपूर येथे रुग्णवाहिकेतून आणण्यात आले.  प्रथम धारुर शहरात त्यानंतर गांजपूर गावात आणि त्यांच्या राहत्या घरी त्यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यांच्या चाहत्यांनी व गावकऱ्यांनी अत्यंदर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. त्यांचा तिरंग्यामधील पार्थिव गावात आणताच गावकऱ्यांनी तसेच एनसीसी व स्काऊट गाईडच्या पथकांनी ढोल ताशाच्या गजरात आणि अमर रहे अमर रहे शहीद विकास समुद्रे अमर रहे, जब तक सुरज चाँद रहेगा शहीद विकास नाम रहेगा अशा घोषणांसह अंतयात्रेत सहभाग घेतला. संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि पोलीस अधिक्षक जी.श्रीधर यांनी शहीद विकास समुद्रे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले व पोलीस दलाच्या पथकाने तसेच भारतीय सैन्य दलाच्या वतीने लेप्टनंट कर्नल नितिन चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे, आमदार संगीता ठोंबरे, आमदार आर.टी.देशमुख, सैनिक कल्याण विभागाचे उपसंचालक तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल हरीभाऊ दळवी, कॅप्टन भिमराव पारवे यांच्यासह असंख्य अधिकारी, पदाधिकारी व देशप्रेमी नागरिकांनी पुष्पचक्र वाहून अभिवादन केले.

शहिद विकास समुद्रे यांचे भाऊ परमेश्वर यांनी चितेला भडाग्नी दिला यावेळी आई, पत्नी, बहिनी, चिमुकली मुलगी आणि नातेवाईकांनी अत्यंत शोकाकूल वातावरणात शहीद विकास यांना अखेरचा निरोप दिला. यावेळी हजारोच्या संख्येने देशप्रेमी नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा