बीड,
दि. 12 :- बीड जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकीची आदर्श आचारसंहिता
लागु झाली असून शासनाच्या सर्व विभागांनी व अधिकाऱ्यांनी आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी
करावी असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवलकिशोर राम यांनी दिले.
राज्य शासनाच्या निवडणूक आयोगाने जिल्हा
परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका जाहिर केल्या असून बीड जिल्ह्यात 16 फेब्रुवारी
रोजी मतदान आणि 23 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक जाहिर झाल्यापासून आदर्श
आचारसंहिता लागू झाली असून या अनुषंगाने सर्व कार्यालय प्रमुखांनी बैठक जिल्हाधिकारी
तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवलकिशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी
मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत सर्व विभागांच्या
अधिकाऱ्यांनी त्याचे काटेकोर पालन करतांना राज्य निवडणूक आयोगाचे आदेश लक्षात घ्यावेत.
असे सांगून जिल्हाधिकारी राम म्हणाले की, विभागांनी दिलेल्या कार्यारंभ आदेशाचा तपशिल
आचारसंहिता कक्षाकडे तात्काळ सादर करावेत. आचारसंहितेपूर्वी सुरु केलेल्या निविदा प्रक्रीयेबाबत
अडचण नाही मात्र आचारसंहिता कालावधीत कोणत्याही कामाचे कार्यारंभ आदेश देणे व नव्याने
काम सुरु करणे आचारसंहितेचा भंग होईल. जि.प. बांधकाम विभागाच्या कामांचा तपशिल तात्काळ
सादर करण्याचे निर्देश देवून जिल्हाधिकारी राम यांनी आचारसंहितेसंदर्भात माहिती दिली.
आचारसंहितेमुळे शासकीय कामकाजात अडचण येवू
नये. दैनदिन कामकाज शासकीय विभागाने सुरु ठेवावे. जिल्हा वार्षिक योजनेच्या विविध कामांची
तयारी या कालावधीत पूर्ण करावी म्हणजे आचारसंहिता कालावधीनंतर प्रत्यक्ष कामे व त्यासंबंधी
खर्च करणे शक्य होणार आहे. असे सांगून त्यांनी टंचाई निवारणाचा आराखडा तयार करण्याच्या
सुचना जिल्हाधिकारी राम यांनी केली. गेल्या वर्षभरात झालेल्या निवडणूका आपल्या जिल्ह्यात
अत्यंत शांततामय वातावरणात तसेच कायद्याचे काटेकोर पालन करुन झाल्या आहेत. जिल्हास्तरीय
यंत्रणांनी निवडणूक कामकाजात चांगली भूमिका बजावली असल्याचे सांगून त्यांनी समाधान
व्यक्त केले.
आचारसंहितेच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांनी
कडक भूमिका ठेवावी. कोणत्याही परिस्थितीत आचारसंहिता भंग झाल्यास संबंधितांविरुध्द
कायदेशीर कारवाई करावी व गुन्हे दाखल करावेत. कोणत्याही अधिकारी कुठल्या परिस्थितीत
हयगय करणार नाही याची दक्षता घ्यावी. अशी सुचना जिल्हाधिकारी राम यांनी केली.
भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान
परिषदेतील औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम घोषित
केला आहे. त्यानूसार 3 फेब्रुवारी रोजी मतदान व 6 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
या निवडणूकीची आचारसंहिता जिल्ह्यात लागू असून त्याच्याही अंमलबजावणीबाबत या बैठकीत
सुचना देण्यात आल्या. आचारसंहितेच्या अंमलबजावणी संदर्भात अधिकाऱ्यांनी विचारलेल्या
प्रश्नांना यावेळी उत्तरे देवून समाधान करण्यात आले.
सामाजिक वनीकरण विभागातर्फे यावेळी वृक्षलागवड
मोहिमेबाबत माहिती देवून मोहिमेत सर्व विभागांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी नामदेव ननावरे, सहाय्यक जिल्हाधिकारी अजित कुंभार, अप्पर जिल्हाधिकारी अनिल
पवार, अप्पर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी,
उपजिल्हाधिकारी (सामान्य) राजेंद्र वाघ, उपविभागीय अधिकारी महेंद्रकुमार कांबळे, उपजिल्हा
निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास
अधिकारी तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा