सोमवार, १६ जानेवारी, २०१७

ई-पोस मशीनमुळे धान्य वाटपात पारदर्शकता - जिल्हाधिकारी नवल किशोर राम






          बीड दि. 16 :- सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत ई-पोस मशीनद्वारे जिल्हयात धान्य वाटपास सुरुवात होत आहे. या प्रणालीमुळे धान्यवाटपात पारदर्शकता येऊन लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे धान्य वेळेत मिळण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.
          बीड तालुक्यातील कुमशी येथील  रास्तभाव दुकानात ई-पोस मशीनद्वारे धान्य वाटप वितरण शुभारंभ जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी  ते बोलत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष राऊत, उपविभागीय अधिकारी विकास माने, सहाय्यक पुरवठा अधिकारी  अविनाश शिंगटे,  तहसिलदार छाया पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
           यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले की, ई-पोस मशीन हे अद्ययावत तंत्रज्ञान सार्वजनिक वितरण व्यवस्थेत वापरण्यात येत असल्याने याबाबतचे योग्य प्रशिक्षण सर्व रास्तभाव दुकानदारांना मिळणे आवश्यक आहे. या मशीनद्वारे धान्य वाटप होणार असल्याने धान्य वाटपात पारदर्शकता येऊन गैरव्यवहाराला आळा बसणार  आहे. तसेच ग्राहकाने आपल्या हक्काबाबत जागृत राहिले पाहिजे व आपल्या मिळणाऱ्या योजनांचा लाभ वेळेवर घेतला पाहिजे, असेही त्यांनी यावेळी  सांगितले.
          जिल्ह्यातील  नागरिकांना जवळपास लोकांना आधार क्रमांक मिळाला असून आधार सिडींगचे कामही मोठ्या प्रमाणावर झालेले आहे. त्यामुळे ई-पोस मशीनद्वारे धान्य वाटप सुरु झाल्याने लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.  पुरवठा विभाग ई-पोस मशीनद्वारे धान्य वाटप सुरु करुन खऱ्या खुऱ्या लाभार्थ्यांपर्यंत जात आहे व त्यामुळे पारदर्शकपणे धान्य पुरवठा होऊन पुरवठा विभागाची प्रतिमा बदलण्यास मदत होणार आहे असे सांगुन  सर्वसामान्य लाभार्थी महिला व पुरुषांनी ई-पोस मशीनचा वापर करुन आपल्या हक्काचे धान्य घ्यावे, असे आवाहनही  जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी यावेळी केले.
          यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष राऊत म्हणाले की,  पुरवठा विभागाने अत्यंत परिश्रम घेऊन जिल्हयातील  लाभार्थ्यांचे आधार क्रमांक सिडींगचे काम केलेले असून  ज्या लाभार्थ्यांचे अधार क्रमांक सिडींग करण्याचे राहिले आहे अशा लाभार्थ्यांनी तात्काळ आधार कार्ड सिडींगचे काम करुन घ्यावे. त्यामुळे यापुढील कालावधीत सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत सर्व रास्तभाव दुकानांतुन ई-पोस मशीनद्वारे धान्य वाटप होणार असल्याने लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे धान्य मिळण्यास मदत होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

          प्रारंभी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ई-पोस मशीनची फित कापून धान्य वाटपाचा शुभारंभ केला व प्रातिनिधीक स्वरुपात त्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना धान्याचे वाटप केले. या कार्यक्रमास नायब तहसिलदार (पुरवठा) परवीण पठाण, तांत्रिक अधिकारी प्रवीण सेंगर, धान्य दुकानदार आर. पी. ढोरमारे यांच्यासह पुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचारी परिसरातील लाभार्थी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा