शनिवार, २१ जानेवारी, २०१७

जि.प. व प.स.निवडणूकीच्या कामकाजाचा घेतला आढावा निवडणुका शांततेत व यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे -जिल्हाधिकारी नवल किशोर राम




बीड, दि. 21 :- जिल्ह्यातील  जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणूका शांततेत आणि यशस्वीपणे पार पाडण्यासाठी निवडणुक यंत्रणा  व पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने व सजगपणे काम करावे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.  
5- औरंगाबाद विभाग विधान परिषद शिक्षक मतदार संघ व जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2017च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली पुर्व तयारी आढावा बैठक घेण्यात आली. त्याप्रसंगी उपस्थित सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
याबैठकीस पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, अपर पोलीस अधिक्षक दिक्षीतकुमार गेडाम, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, गणेश निऱ्हाळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
 यावेळी जिल्हाधिकारी राम पुढे म्हणाले की, 5- औरंगाबाद विभाग विधान परिषद शिक्षक मतदार संघ व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूका शांततामय वातावरणात व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सर्व विभागांत समन्वय गरजेचा आहे. तसेच मतदान केंद्राच्या ठिकाणी पिण्याचे पाणी, वीज, अपंगांसाठी रॅम्पची व्यवस्था चोख असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व पोलीस अधिकारी यांनी सर्व मतदान केंद्रांना भेटी देवून पाहणी करावी व तेथील पोलीस बंदोबस्ताविषयी आराखडा तयार करावा. पोलीस विभागाने संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्राची माहिती घ्यावी. मागील काळातील घटनांची माहिती घेऊन अशा केंद्रावर अतिरिक्त बंदोबस्त ठेवावा.
  निवडणूकीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे अत्यंत आवश्यक असून त्यादृष्टीने पोलीस विभाग व उपविभागीय दंडाधिकारी यांनी प्रतिबंधात्मक कारवाईला वेग देण्याची गरज आहे असे सांगुन संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या निवडणूक प्रक्रियेचे गांभीर्य ओळखून त्यांच्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी चोखपणे पार पाडण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी श्री राम यांनी यावेळी दिले.
जिल्हाधिकारी राम यांनी निवडणूकीच्या अनुषंगाने आवश्यक असणारे विविध समित्यांचा तसेच स्थिर तपासणी पथके व अचानक तपासणी करणारी पथके, मतदान यंत्र, अधिकारी- कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, जनजागृती इत्यादी बाबीविषयी सविस्तर आढावा घेवून योग्य त्या सूचना केल्या. तसेच आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्यासाठी संपूर्ण निवडणूक यंत्रेणेने अधिक प्रभावीपणे काम करावे असे आवाहनही त्यांनी केले. या निवडणूकीतील उमेदवारांना निवडणुक विषयक विविध परवाने घेण्यासाठी अनेक ठिकाणी जावे लागते हे टाळण्यासाठी व उमेदवारांना अवश्यक असणाऱ्या परवानग्या एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्यासाठी एक खिडकी कक्षाची स्थापना करुन या कक्षामध्ये सक्षम अधिकाऱ्यांच्या  नियुक्त्या करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी श्री राम यांनी यावेळी दिल्या. यावेळी 5- औरंगाबाद विभाग विधान परिषद शिक्षक मतदार संघ व जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक हे मतदान केंद्रांना भेटी देवून प्रत्यक्ष आढावा घेणार असल्याचे सांगण्यात आले.  

 यावेळी पोलीस अधिक्षक जी. श्रीधर यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाकडुन करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली. या बैठकीस निवडणूक निर्णय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस अधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा