मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०१६

बालदिन व बालकामगार प्रथा विरोधी सप्ताहानिमित्त कार्यक्रम संपन्न



             बीड दि. 15 :- बालदिन व 14 ते 21 नोव्हेंबर बालकामगार प्रथा विरोधी सप्ताहाचे औचित्य साधून राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प, जिल्हाधिकारी कार्यालय,बीड यांच्यावतीने बालकामगार प्रथा विरोधी जनजागृती रॅली व चित्ररथाचे उदघाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
            बालदिनानिमित्त आयोजित रॅलीच्या उदघाटन प्रसंगी बालकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले व बालकामगार ही अनिष्ट प्रथा रोखण्यासाठी बालकामगार प्रथा विरोधी रॅलीस हिरवा झेंडा दाखवुन रॅलीस सुरुवात करण्यात आली. या उदघाटन प्रसंगी प्रमुख उदघाटन बालकल्याण समितीचे अध्यक्ष दत्ता नलावडे, शिक्षणाधिकारी विक्रम सारुक, महिला व बालकल्याण पर्यवेक्षक सुदाम निर्मळ, राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाचे संचालक ओमप्रकाश गिरी, बालकामगार प्रकल्प समितीचे सदस्य राजकुमार घायाळ, तत्वशिल कांबळे, अतुल कुलकर्णी, पी.आर.जोशी, सामाजिक कार्यकर्ते अशोक तांगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.            
            समारोप प्रसंगी बीड जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर म्हणाले की, बीडची ओळख ही ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून आहे. कामगाराचा मुलगा परत कामगार होऊ नये, बालमजुर होऊ नये यासाठी शासन स्तरावर विविध उपक्रम राबविले जात असून राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाच्या माध्यमातून उत्कृष्ट काम होत आहे. समाज आणि शासन यांनी संयुक्त प्रयत्न करुन कामगाराचा मुलगा कामगार न राहता अधिकारी व्हावा यासाठी विशेष प्रयत्न करावेत असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.
            बालदिनानिमित्त निरंतर शिक्षणचे शिक्षणाधिकारी विक्रम सारुक म्हणाले की,  बालकांना शिक्षण मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. शासन व समाजाने एकत्र येऊन बालकामगार व शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दाखल करण्याचे पवित्र कार्य सर्वांनी एकजुटीने करावे  असेही त्यांनी सांगितले. उदघाटन प्रसंगी प्रास्ताविक करतांना संचालक श्री.गिरी म्हणाले की, बालकामगार प्रथा विरोधी सप्ताहानिमित्त जिल्हाभरात चित्ररथाच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येणार असून बालमजूरांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा संदेश प्रकल्पाच्या माध्यमातून देण्यात येत आहे तसेच राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाच्या कार्याबद्दल उपस्थितांना माहिती दिली.

            कार्यक्रमाच्या प्रथम बालकामगार प्रथाविरोधी रॅली शिवाजी पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे जावून डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे रॅली व बालदिन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. रॅलीमध्ये बालकामगार विशेष प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थी,कर्मचारी आणि शहरातील सामाजिक संस्था, संघटना, बालप्रेमी नागरीक यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती तुरुकमारे यांनी केले तर आभार श्री.साबळे यांनी मानले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा