शनिवार, २६ नोव्हेंबर, २०१६

नगर परिषद निवडणूक-2016 निवडणूक प्रक्रियेवर प्रशासनाची करडी नजर - जिल्हाधिकारी नवल किशोर राम




बीड दि. 26 :- नगर परिषद निवडणूका सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उत्तम नियोजन केले आहे. निवडणूकीसाठीच्या मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेवर व्हिडीओ तसेच सीसीटीव्ही कॅमेरांद्वारे करडी नजर ठेवली जाणार आहे. त्यामुळे सर्वांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.
नगर परिषद निवडणूकीच्या पुर्वतयारीचा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज धारुर येथील तहसील कार्यालयात आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. यावेळी धारुरचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन बारवकर, तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजाभाऊ कदम, पोलीस उप अधिक्षक श्रीमती अंजुमआरा शेख, नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले, नायब तहसीलदार सुहास हजारे, पोलीस निरीक्षक धरमसिंग चव्हाण, गट विकास अधिकारी तथा आचारसंहिता पथक प्रमुख श्रीमती. कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले की, निवडणूकीच्या कामामध्ये कोणीही प्रकारची दिरंगाई, हलगर्जीपणा करताना दिसून आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले असल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्यासह इतर संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परस्पर समन्वयाने काम करावे. तसेच मतमोजणी केंद्रातील व्यवस्था व सुरक्षा कक्ष याबाबत विशेष दक्षता घ्यावी. मतमोजणी केंद्रामध्ये व्हिडीओ कॅमेरा आणि सीसीटीव्ही कॅमेराची व्यवस्था करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी दिल्या.
या बैठकीत जिल्हाधिकारी राम यांनी आचारसंहिता पथक, निवडणूक खर्च, पोलीस बंदोबस्त, मतदान यंत्रे, व्हिडीयो चित्रीकरण, व्होटर स्लीप, भरारी पथक, वाहन व्यवस्था, निवडणूकीच्या कामाशी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण याबाबत सविस्तर आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या.
धारुर शहरात 8 प्रभाग असून निवडून द्यावयाच्या सदस्यांची संख्या 17 आहे तर मतदानासाठी 21 मतदान केंद्रे आहेत. धारुर शहरामध्ये एकूण मतदार संख्या 15 हजार 933 असून यापैकी 7 हजार 548 स्त्री मतदार असून 8 हजार 385 पुरुष मतदार असल्याची माहिती यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी सचिन बारवकर यांनी दिली. या बैठकीस निवडणूकीसाठी नियुक्त करण्यात आलेले झोनल ऑफीसर, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीपुर्वी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी धारुर येथील मतदान केंद्रे व मतमोजणी केद्राला भेट देऊन तेथील निवडणुकीच्या कामाबाबतच्या पुर्वतयारीची पाहणी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा