मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०१६

जिल्ह्यात कलम 144 प्रमाणे मनाई आदेश लागु



             बीड दि. 15 :-जिल्ह्यात आगामी काळात नगर पालिका निवडणूका, सण, उत्सव, महोत्सव व इतर कार्यक्रम काळात दहशतवादी (इसीस संघटना) करवायाच्या अनुषंगाने जिल्ह्यात दहशतवादी संघटनांकडून, अनाधिकृत खाजगी अथवा शासकीय जागेत परराज्यातील नागरीक यांच्याकडून अनुचित घटना घडण्याची तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने बीड जिल्ह्यात सीआरपीसी कलम 144 प्रमाणे मनाई आदेश लागु करण्यात येत आहे. पोलीस अधिक्षकांच्या अहवालामध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) प्रमाणे मनाई आदेश लागु करण्याची आवश्यकता असल्याने बीडचे जिल्हादंडाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्ह्यात खालील बाबी करण्यास मनाई आदेश दिला आहे.

            जिल्ह्यात कोणत्याही व्यक्तीला वाहनांच्या खरेदी, विक्री संबंधात पोलीस स्टेशनला माहिती न देता नव्या, जुन्या वाहनांची खरेदी, विक्री करता येणार नाही. कोणत्याती परप्रांतीय, परदेशी व्यक्तीला किरायाणे, भाड्याने ठेवतांना घरमालक, लॉजमालक, धर्मादाय संस्था यांनी वास्तव्यास राहणाऱ्या व्यक्तीचे ओळखपत्र व निवासाचा पत्ता या बाबतची माहिती संबंधित पोलीस स्टेशनला देणे बंधनकारक राहील. आक्षेपार्ह गाणी, संगीत वाजविल्यामुळे जातीय-धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याने बीड जिल्ह्यात कोणत्याही कार्यक्रमात अथवा कोणत्याही ठिकाणी जातीय-धार्मीक तेढ निर्माण करतील असे आक्षेपार्ह गाणी, संगीत वाजविण्यास मनाई करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सायबर कॅफे वर येणाऱ्या सर्व ग्राहकाचे रजिस्टरवर संपूर्ण नाव, पत्ता यांची नोंद घेवून त्यांचे ओळखपत्र सायबर कॅफे चालकांनी ठेवावे. असे आदेश जिल्ह्यात दि.15 नोव्हेंबर 2016 रोजीच्या 11 वाजेपासून ते दि.31 नोव्हेंबर 2016 चे रात्रीचे 12 वाजेपर्यंत लागू राहतील. असे आदेशात नमूद केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा