सोमवार, १० ऑक्टोबर, २०१६

गेवराई शहराचा मॉडेल शहर म्हणून विकास व्हावा - मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस










बीड, दि. 10 - गेवराई शहराचा 'मॉडेल शहर' म्हणून विकास व्हावा अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. या शहराच्या विकासासाठी आपण सर्वतोपरी मदत करु अशी ग्वाहीही त्यांची यावेळी दिली.
            गेवराई नगर पालिकेच्या इमारतीचे उदघाटन आणि लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज झाले.  या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे या होत्या.  यावेळी व्यासपीठावर खासदार  डॉ. प्रितम मुंडे, गेवराईचे आमदार लक्ष्मणराव पवार, माजलगावचे आमदार आर.टी. देशमुख, केजच्या आमदार संगीता ठोंबरे, गेवराईचे नगराध्यक्ष महेश दाभाडे, प्रकाश सुरवसे, रमेश पोकळे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर आदींची उपस्थिती होती.
            यावेळी मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की, राज्यात शहरीकरणाचा वेग सतत वाढत आहे. अशावेळी शहरातील मुलभूत सोई-सुविधांवर मोठा ताण पडत असून त्यांचा वेगाने विकास करणे आवश्यक आहे. गाव आणि शहर यांचे परस्परांशी असलेले नाते कायम राखून या दोन्हींचाही विकास करण्याची भूमिका सरकारने घेतली आहे.  या भुमिकेतूनच ग्रामीण व शहरी भागासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. 
             गेवराई नगरपालिकेनेही विविध योजना कार्यक्षमतेने राबविल्या आहेत. वित्तीय शिस्त पाळल्याची ग्वाही दिली गेली आहे.  स्वच्छ भारत अभियानात आपले राज्य उत्तम कामगिरी बजावत आहे.  याच अभियानात गेवराईत वैयक्तिक शौचालये बांधण्याचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे.  उर्वरित काम लवकरच पूर्ण व्हावे, अशी आपली अपेक्षा आहे. स्वच्छतेचा संबंध थेट आरोग्याशी आहे, आणि हे लक्षात घेऊनच पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीचा आग्रह धरत आहेत. या अभियानामध्ये महाराष्ट्र राज्य शहरी व ग्रामीण भागात अग्रस्थानी असल्याचे सांगून गेवराई नगरपालिकेनेही संपूर्ण शहर शंभर टक्के हागणदारीमुक्त करावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
            शहरातील मुलभूत सुविधांचा झपाट्याने विकास होणे आवश्यक असल्याचे सांगत मुख्यमंत्री  श्री फडणवीस म्हणाले की स्मार्टव्हिलेजच्या माध्यमातून राज्यातील गावांचा विकास करण्याबरोबर शहरी भागातही परिवर्तन झाले पाहिजे.  शहरातील नागरिकांना मुलभूत सोई-सुविधा मिळाल्या पाहिजेत. शहरी भागात शिक्षण, आरोग्य, रोजगार, पिण्याचे स्वच्छ पाणी, सांडपाण्याचे व्यवस्था असा शाश्वत विकास झाला तरच शहरांचा खऱ्या अर्थाने विकास झाला असे म्हणता येईल, असेही  त्यांनी यावेळी सांगितले.
            गतकाळात दुष्काळी परिस्थितीमुळे अपुऱ्या प्रमाणातील पाण्यामुळे नागरिकांसह जनावरांच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता.  पाणी हेच जीवन असून पाण्याचा प्रत्येक थेंब न् थेंब वाचवणे व जपून वापरणे ही काळाची गरज बनली आहे.  उपलब्ध पाण्यापैकी 50 टक्के पाणी हे गळतीमुळे वाया जात असल्याने पाणी पुरवठ्याची योजना तयार करताना पाणी वाटपाचे  उचित नियोजन करण्याची गरज असल्याचे सांगत मराठवाड्यातील जनतेला शुद्ध व मुबलक प्रमाणात पाण्याचा पुरवठा करण्यासाठी गुजरात राज्यातील योजनेच्या धर्तीवर वॉटर ग्रीड योजना कार्यान्वित करण्यात येत असून या माध्यमातून शेतकरी, गावे व उद्योगांना पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री  श्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
            देशातील बेघर नागरिकांना त्यांच्या हक्काचे घर उपलब्ध व्हावे यादृष्टीकोनातून प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येत असून या योजनेंतर्गत राज्यात 1 लाख घरांची निर्मिती करण्यात येत आहे.  झोपडपट्टीमध्ये गेल्या 25-30 वर्षापासून नागरिकांना निराश्रितासारखं रहावं लागत आहे.  अशा निराश्रितांना त्या ठिकाणच्या मालकी हक्काचे पट्टे मिळवून देण्यासाठीही सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.  या संदर्भातील गेवराई नगरपरिषदेच्या हद्दीतील प्रश्न तीन महिन्यात सोडविण्याची ग्वाही त्यांनी दिली. त्याचबरोबर भविष्यात अतिक्रमणे होणार नाहीत, याची नगरपालिकेने काळजी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. गेवराईसाठी पंतप्रधान आवास योजनेतून जास्तीत जास्त घरे उपलब्ध करुन देण्यात येतील, असे ते म्हणाले.
            शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे सांगत जिल्हा परिषदेच्या शाळेतून विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत आहे.  या अभियानाचा फायदा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होत आहे.  या शाळांचा दर्जा सुधारण्याचे काम 2018 पर्यंत पूर्ण होईल, असे ते म्हणाले. राज्यातील 25 हजार शाळा डिजिटल करण्यात आल्या आहेत.  या शाळांमधून विद्यार्थ्यांना जगभरातील ज्ञान देण्यात येत असून यामुळे ग्रामीण व शहरी भागातील शिक्षणाची दरी संपुष्टात आली असल्याचेही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
            गेवराई नगरपालिकेने शहरात साठणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प तसेच शहरातील पथदिव्यांसाठी एलईडी बल्ब बसविण्याच्या कामांचा प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना देत या कामांसाठी शासनातर्फे सर्वतोपरी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.   मराठवाडा विभागातील अतिवृष्टीचा उल्लेख करुन मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या वर्षी अवर्षणाचे संकट होते.  तेंव्हा पीकविम्याच्या माध्यमातून सरकारने भरघोस मदत केली.  आता अतिवृष्टीचे संकट आहे.  या संकटावर मात करण्यासाठी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे.  शेतकऱ्यांना पंतप्रधान पीकविमा योजनेतुन मदत दिली जाईल.  अशा मदतीसाठी वैयक्तिक पंचनाम्यांची गरज असणार नाही, अशी भूमिका सरकारने घेतली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

            राज्याच्या ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेचे महत्व लक्षात घेऊन संपूर्ण भारत देशात  स्वच्छता अभियान सुरु केले. आज घराघरामध्ये या अभियानाबाबत मोठ्या प्रमाणात जागृती निर्माण झाली असून महाराष्ट्र राज्य हे स्वच्छतेच्या बाबतीत संपूर्ण देशात अग्रक्रमावर असून स्वच्छता असेल तरच देशात आरोग्य नांदेल व एक सदृढ पिढी निर्माण होईल, असा विश्वासही श्रीमती मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला.  त्यांनी गेवराई नगरपालिकेच्या कामाची प्रशंसा केली. यावेळी खासदार श्रीमती प्रितम मुंडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांनी केले. कार्यक्रमास नगरपालिकेचे उपाध्यक्ष मधुकर वारे, सभापती राजेंद्र राक्षसभुवनकर, नगरसेवक सर्वश्री गीता बाळराजे पवार, दादासाहेब गिरी, ज्ञानेश्वर गंगाधर, जे.डी. शहा यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी, पत्रकार तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी केशव चव्हाण आणि मुकेश मोटे यांना मुख्यमंत्री निधीतून मदतीचे धनादेश वितरीत करण्यात आले. माजलगाव येथील जय महाराष्ट्र गणेश मंडळाचे तुळशीराम कळसाईतकर यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आदर्श कार्यकर्ता गौरव पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा