सोमवार, ३ ऑक्टोबर, २०१६

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत पालकमंत्री पंकजा मुंडे यांचे निर्देश














बीड, दि. 3 :-  बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचानामे करण्याचे निर्देश राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी देऊन औरंगाबाद येथे होणाऱ्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये आपदग्रस्तांना तातडीने मदत  मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन जिल्हयाची पालकमंत्री या नात्याने पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
            पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आज बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची बीड शहरातील खासबाग, बिंदुसरा प्रकल्प तसेच हिंगणी खु आणि जेबा पिंपरी गावांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी  केली. हिंगणी खु. येथे ग्रामस्थांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.
            यावेळी खासदार डॉ.प्रितमताई मुंडे, नगर परिषदेचे गटनेते डॉ.भारतभुषण क्षीरसागर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, रमेश पोकळे, संतोष हंगे, स्वप्नील गलधर, शेख जमादार यांची उपस्थिती होती.
            यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, जिल्हयाने गेल्या तीन वर्षात सातत्याने दुष्काळाचा सामना केला आहे. यावर्षीही पाऊस होतो की नाही याची चिंता सर्वांना लागून राहिली होती. परंतु वरुणराजाने जिल्ह्यावर कृपादृष्टी केल्याने जिल्हयातील सर्व प्रकल्पामध्ये चांगला जलसंचय निर्माण झाला आहे. आणि परतीमध्ये जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत अतिवृष्टीला  सामोरे जावे लागले. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेती, घरे, रस्ते आणि पुलांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, जेणेकरुन आपदग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळू शकेल. यासाठी जिल्हयाची पालकमंत्री या नात्याने औरंगाबाद येथे होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीस मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहे. तसेच ज्या गावांचे पुर्नवसन करणे गरजेचे आहे त्याबाबतचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने तातडीने सादर करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची  माहितीही पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी दिली.
            अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी जिल्हयात एन.डी.आर.एफ. चे पथक कार्यरत करण्यात आले आहे. सरकार तुमचे आणि तुमच्या पाठीशी असल्याने लोकांनी घाबरुन न जाता धीराने या परिस्थितीचा सामना करावा. तसेच अशी परिस्थिती पुन्हा उद्भवल्यास नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी करुन संबंधित यंत्रणेला दक्ष राहण्याचे निर्देश दिले. जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांमुळे जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पांमध्ये चांगला जलसंचय निर्माण होण्याबरोबरच प्रकल्प, नदी-नाले, बंधाऱ्यातील गाळ काढणे आणि रुंदीकरणाच्या कामामुळे अतिवृष्टीचे पाणी या कामांमध्ये सामावल्याने अतिवष्टीच्या नुकसानीची तीव्रता कमी होण्यास मदत झाली आहे, हा सुध्दा जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांचा एक अजून फायदा असल्याचा उल्लेख पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी केला.

            पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांच्या दौऱ्यात बीड शहरातील खासबाग, हिंगणी खु., जेबा पिंपरी येथील नुकसानग्रस्त शेतकरी, नागरिक, महिला यांच्याशी संवाद साधून झालेल्या नुकसानीची माहिती घेऊन तातडीने नुकसान भरपाई देण्याचा विश्वास दिला. यावेळी  बीडचे उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार छाया पवार यांच्यासह हिंगणी खु. आणि जेबा पिंपरी पंचक्रोशीतील ग्रामस्थ, नागरिक, महिला, पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा