मंगळवार, २५ ऑक्टोबर, २०१६

निवडणूक पूर्व तयारीचा घेतला आढावा नगर परिषद निवडणूकीत आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे - जिल्हाधिकारी नवल किशोर राम




            बीड, दि. 25 :- बीड जिल्ह्यातील सहा नगर परिषदांच्या सार्वत्रिक निवडणूका घोषित झाल्याअसून तेंव्हापासून आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी सुरु आहे. आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होईल याची सर्वांनी दक्षता घ्यावी अशी सुचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केली.
          बीड जिल्ह्यातील नगर परिषदांच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस अधिकारी, जिल्हा संनियंत्रण समितीचे सदस्य अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी राम बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मुख्य निवडणूक निरीक्षक नामदेव ननावरे, अप्पर पोलीस अधिक्षक वैभव कलबुर्मे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी व अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा गेवराई, माजलगाव व धारुर नगर परिषद निवडणूकीचे निरीक्षक धनराज निला यांची प्रमुख उपस्थिती होती.
          जिल्ह्यातील संपूर्ण सहा नगर परिषद निवडणूकीच्या पूर्व तयारीचा आढावा घेऊन जिल्हाधिकारी राम पुढे म्हणाले की, राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानूसार आदर्श आचारसंहितेचे कुठल्याप्रकारे उल्लंघन होणार नाही याची सर्व यंत्रणा अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. निवडणूक जाहिर झाल्यापासून निवडणूक संपेपर्यंत राज्य निवडणूक आयोगाच्या अंतर्गत सर्व अधिकारी-कर्मचारी यांची सेवा राहणार असून कुणीही जबाबदारी टाळू नये. असे केल्याचे आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल. आचारसंहिता नगरपरिषद निवडणूकीच्या हद्दीत लागू असून इतर क्षेत्रात आचारसंहिता लागू नसली तरी निवडणूक क्षेत्रातील मतदारांवर प्रभाव पडेल अशा बाबी करु नयेत असे निर्देश आयोगाने दिलेले आहेत. आचारसंहितेच्या अंमलबजावणीमध्ये कुठल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. अशा बाबी निदर्शनास आल्यास संबंधितांविरुध्द कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही यावेळी जिल्हाधिकारी राम यांनी दिला.
          निवडणूक कामकाज व आदर्श आचारसंहितेसंदर्भात प्रत्येक नगरपरिषद स्तरावर प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात याव्यात अशी सुचना करुन जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी सखोल मार्गदर्शन केले. शस्त्रास्त्रे  व हत्यारे वापरण्यावर बंदी, ध्वनीप्रदुषण नियंत्रण कायदा-2000, मुंबई पोलीस अधिनियम1951 व सुधारीत-2000, ध्वनीक्षेपकाचा वापर, फौजदारी प्रक्रिया संहिता-1973, भारतीय दंडविधान-1860 निवडणूकीसंबंधी अपराध, महाराष्ट्र मालमत्तेच्या विरुपणास प्रतिबंध करण्याकरीता अधिनियम-1995 निवडणूक काळात सार्वजनिक सभा, दारुबंदी, शासकीय वाहने वापरण्यावर बंदी इत्यादी बाबींविषयी या बैठकीत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
          मतदान केंद्र व मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी करावयाच्या दक्षतेबाबत सुचना करुन अधिक संवेदनशील व संवेदनशील मतदान केंद्राचा तपासणी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राम यांनी दिले.
          निवडणूक काळात खर्चावर व प्रचारावर लक्ष ठेवण्यासाठी व्हिडीओग्राफी, भरारी पथके, चेकपोस्टसाठी पथक, तक्रार निवारण कक्ष याची स्थापना पोलीस विभागाच्या सहभागाने करावयाची आहे. 5 लाखापेक्षा जास्त रक्कमेच्या बँक व्यवहारावर निवडणूक काळात सनियंत्रण करण्यात येणार आहे. या संबंधात बँकांना सुचना देण्यात येणार आहेत. असे सांगून जिल्हाधिकारी राम यांनी निवडणूकीसाठी नामनिर्देशने भरुन घेण्याच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शन केले.
          मतदान जनजागृती करुन जास्तीत जास्त मतदारांना मतदानासाठी आकर्षित करण्याबाबत विविध उपाययोजना व कार्यक्रम राबविण्यात याव्यात असे सांगून या बैठकीत निवडणूक विषयक बाबींविषयी उपयुक्त सुचना करण्यात आल्या.

          या बैठकीस बीड नगरपरिषद निवडणूक निरीक्षक तथा जिल्हा कोषागार अधिकारी डी.डी.माडे, परळी-अंबाजोगाई नगरपरिषदेच्या निवडणूक निरीक्षक तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक संगीता पाटील तसेच निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी विकास माने (बीड), शिवकुमार स्वामी (अंबाजोगाई), अरविंद लाटकर (परळी वै), श्रारंग तांबे (माजलगाव), श्रीमती शोभा ठाकुर (गेवराई), सचिन बारवकर (धारुर), तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, नगर परिषदांचे मुख्याधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा