मंगळवार, ४ ऑक्टोबर, २०१६

5 ऑक्टोबर रोजी निवडणूकांसाठी आरक्षण सोडत



            बीड, दि.4 :- जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रमान्वये बुधवार दि.5 ऑक्टोबर 2016 रोजी दुपारी 2  वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत गटाची आरक्षण सोडत घेण्यात येणार आहे. तर पंचायत समित्यामधील आरक्षण सोडत संबंधित तालुक्याचे तहसिलदार आणि जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेले उपजिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बुधवार दि.5 ऑक्टोबर 2016 रोजी दुपारी 2 वाजता संबंधित तहसिल कार्यालयामध्ये होणार आहे.

            प्रारुप प्रभाग रचना व आरक्षणासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानूसार पुनर्रचित निवडणूक गटावर किंवा गणावर कोणते आरक्षण होते. हे ठरविण्यासाठी त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या गावांवर मागील निवडणूकीमध्ये असलेले आरक्षण विचारात घेवून मागील निवडणूकीत एकाच प्रकारचे आरक्षण असलेल्या गावांच्या लोकसंख्येची लगतच्या जनगणनेनूसारची बेरीज पुनर्रचित निवडणूक विभाग, निर्वाचक गणाच्या एकुण लोकसंख्येच्या 50 टक्के पेक्षा जास्त असेल तर त्या गावांवर असलेले आरक्षण मागील निवडणूकीमध्ये पुनर्रचित गट, गण असल्याचे मानण्यात येणार आहे. तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रमानूसार प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती व सुचना स्विकारण्यासाठी जिल्हास्तरावर उपजिल्हाधिकारी (सामान्य) तसेच तालुका स्तरावर संबधित तहसिलदार यांना दि.10 ते 20 ऑक्टोबर 2016 या कालावधीत स्विकारण्याचे आदेश दिले आहेत. असे जिल्हाधिकारी, बीड यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा