शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०१६

नगर परिषद निवडणूक-2016 च्या पार्श्वभूमीवर सनियंत्रण समितीची बैठक संपन्न


       बीड, दि. 20 :- राज्य निवडणूक  आयोगाने राज्यातील  212 नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार बीड जिल्ह्यातील बीड, माजलगाव, परळी वैजनाथ, अंबाजोगाई आणि धारुर नगर परिषदांसाठी दिनांक 27 नोव्हेंबर 2016 रोजी मतदान होणार असून दिनांक 28 नोव्हेंबर 2016 रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणूका निर्भयपणे व पारदर्शक पध्दतीने पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे असे निर्देश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले.
          जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या नगर परिषद निवडणूक-2016 च्या सनियंत्रण समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी नवल किशोर राम बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, अपर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी.आर. माळी, जिल्हा गोषागार अधिकारी डी.डी. माडे, नगर पालिका प्रशासन अधिकारी सतीश शिवणे, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिक्षक एस.व्ही. देशमुख या सनियंत्रण समिती सदस्यांची उपस्थिती होती.
          नगर परिषदांच्या ‍निवडणूकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता अंमलात आली असल्याने सर्व शासकीय यंत्रणांनी आचारसंहितेच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन व अंमलबजावणी करावी. बीड जिल्हयात होणार असलेल्या सहा नगर परिषदांच्या निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनीही आदर्श आचासंहितेच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. तसेच निवडणूक कालावधीत जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस विभागाने दक्षता घ्यावी असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगून निवडणूक होणाऱ्या नगर परिषदांच्या कार्यक्षेत्रातील मतदारांमध्ये मतदानाबाबत व्यापक जनजागृती करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.
          प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी व खर्चावर नियंत्रण ठेवणे, निवडणूक सनियंत्रण समिती, व्हिडीयोग्राफी सर्व्हेलियन्स पथक, भरारी पथक, चेक पोस्ट, तक्रार निवारण कक्ष, मतदार जनजागृती, निवडणूक काळात काय करावे काय करु नये, मालमत्तेचे विद्रुपीकरण विरोधी कायद्याची अंमलबजावणी, निवडणूक काळात परवानाधकांची शस्त्रे जमा करणे, पेड न्युज याबाबत सविस्तर माहिती दिली.

          या बैठकीस नगर  परिषद निवडणूक सनियंत्रण समितीचे सदस्य, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा