शनिवार, ९ मार्च, २०१९


                                               
                                                                   






                                               सामान्य माणसासाठी रस्ते कामांच्या


                                             माध्यमातून विकासाचा पाया मजबूत केला
                                                                           -- पालकमंत्री पंकजा मुंडे
                                                     
बीड, दि.9:- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 च्या औरंगाबाद ते येडशी या 190 कि.मी. लांबीच्या मार्गाच्या चौपदरीकरण कामाचा लोकार्पण सोहळा राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री  तथा जिल्हयाच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा  मुंडे यांच्या उपस्थितीत झाला. याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते व्हीडीओ कॉन्फरन्स द्वारे आणि मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते प्रत्यक्ष  महामार्गाचे लोकार्पण आणि केंद्रीय मार्ग निधीतून पैठण ते शहागड रस्ते सुधारणा व औरंगाबाद जिल्हयातील बोरगाव-देवगाव-लासूर स्टेशन  या राज्य मार्गाचे रुंदीकरण अशा 77 कोटी रुपयांच्या कामाच्या कोनशिलेचे डिजीटल अनावरण करुन  भूमीपूजन करण्यात आले.
 कार्यक्रमास खा. डॉ.प्रीतम मुंडे, जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार, आ.जयदत्त क्षीरसागर, आ.लक्ष्मण पवार, आ.भिमराव धोंडे, आ.संगिता ठोंबरे, आ.आर.टी.देशमुख, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, गेवराईचे नगरराध्यक्ष सुशील जवंजाळ, सां.बा. विभागाचे मुख्य अभियंता खंडेराव पाटील, महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक अजय गाडेकर, श्री.घाणेकर, दिपक राऊत आदी उपस्थित होते.
आज लोकार्पण झालेल्या औरंगाबाद-येडशी महामार्गाच्या कामासाठी 1 हजार 871 कोटी रुपये खर्च आला असून यामधून महामार्गावर 5 नदीवरील मोठे पूल, 5 उड्डाण पूल,59 लहान पूल,77 कि.मी. लांबीचे सर्व्हीस रोड यासह तीन टोल प्लाझा,दोन सुविधा व विश्रांती स्थळ आदी कामे पूर्ण करण्यात आले आहेत.आज पासून हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
यावेळी बोलताना श्रीमती मुंडे म्हणाल्या, रस्ते विकास,स्वच्छता अ‍भियान, महिलासांठी उज्वल योजनेतून स्वयंपाकाचा गॅस, सौभाग्य योजनेमधून वीज जोडणी अशा अनेक  योजनांमधून विकासापासून दूर असलेल्यांना दिलासा देण्याचे व विकासाच्या मार्गावर आणण्याचे काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या  मार्गदर्शनाखाली झाले तर जिल्हयाच्या विकासाचा पाया घालण्याचे काम  मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झाले आहे. 810 कि.मी. चे रस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करताना जिल्हयास 55 कोटी रुपये तर ग्राम विकास विभागाच्या माध्यमातून 25:15 योजनेतून 58 कोटी रुपये निधी दिला आहे.
श्रीमती मुंडे पुढे म्हणाल्या, नुसता रस्ते विकास करुन न थांबता जिल्हयातील श्रध्दास्थानांच्या विकासासाठी तीर्थक्षेत्र विकास योजनेतून नारायणगड,गहिनीनाथगड,पोहरागड आदीसांठी ही मोठा निधी उपलब्ध केला आहे. पोहरागडला देशभरातून भाविक येत असतात याचा विचार करुन 25 कोटी रुपये प्राथमिक मंजूर केले असताना त्यात वाढ करुन प्रत्यक्षात 125 कोटी रुपयांचे विकास कामांचे नियोजन केले आहे. जिल्हयातील रेल्वे मार्गाचे स्वप्न प्रत्यक्षात पूर्ण होत आहे. याचबरोबर मराठवाडयाला वॉटरग्रीड मधून पाणी उपलब्ध करुन देण्यात येणार असून या माध्यमातून हा भाग विकसित व्हावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.
 रस्ते झाल्याने वाहतूक,प्रवासी,भाविक यांच्या संख्येत वाढ होवू लागली आहे. रस्त्याच्या बाजूने हॉटेल,ढाबे आदी व्यवसाय निर्माण होऊन रोजगारात वाढ होते. यातूनच सामान्य माणसाच्या विकासासाठी मोठे काम होत आहे. या विकास कामांमधून मराठवाडयातील बीडबरोबरच इतर जिल्हयामध्ये नदी वाहणार, रस्ते धावणार व जनता समृध्द होणार यासाठी विकास योजनांचे नियोजन करुन  पाया मजबूत करण्याचे काम केले आहे, असे मंत्री पंकजाताई म्हणाल्या.
खासदार डॉ. प्रीतमताई म्हणाल्या साडेचार वर्षामध्ये जिल्हयाच्या विकासासाठी केंद्र शासनाच्या विविध योजनांमधून साडे दहा हजार कोटी रुपये उपलब्ध झाले असून यासाठी जिल्हयापासून केंद्रापर्यंत असलेली विकासाची मजबूत साखळी कारणीभूत ठरली आहे. रस्ते विकासासाठी मोठा निधी देताना कृषी उत्पादनांच्या वेगवान वाहतुकीची सोय होईल, बाजारपेठ जवळ आल्याने त्याचा फायदा शेतक-याना होणार आहे. यासाठी जिल्हयातून जाणारे 18 राष्ट्रीय महामार्ग महत्वाचे ठरणार असून देशातील इतर कोणत्याही जिल्हयापेक्षा ही संख्या मोठी आहे, असे त्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे महामार्गाचे लोकार्पण
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग,जलसंपदा, नौकानयन व नदी विकास, गंगा पुनरुत्थान मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथून व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे आजच्या कार्यक्रमात सहभागी होत मार्गदर्शन केले.ते म्हणाले, जिल्हयामध्ये बाराशे किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्गाची कामे होत असून यासाठी प्रशासनाने केलेली वेगवान कार्यवाही महत्वाची आहे. आजचा लोकार्पण होणारा महामार्गाचा टप्पा पूर्ण होण्यासाठी औरंगाबाद,जालना व बीड येथील जिल्हाधिकारी आणि शासन यंत्रणेचे मी अभिनंदन करतो.या महामार्गासोबतच यास जोडणारे विविध मार्ग,बायपास आदींची अनेक कामे केली जात आहे.  विकास रस्त्याशिवाय होऊच शकत नसल्याने बीडसह आठही जिल्हयात  कामे पूर्ण केली जात आहे. रस्त्याबरोबरच मराठवाडयासाठी पाण्याचा प्रश्न महत्वाचा असून महाराष्ट्र समृध्द संपन्न व्हावा, यासाठी ठाणे व कोकण भागातून समुद्रात वाहून जाणारे पाणी दमन गंगा- पिंजाळ प्रकल्पाच्या माध्यमातून गोदावरीमध्ये आणण्यात येईल. नाशिक,नगर व जायकवाडीमध्ये येणा-या पाण्यामुळे मराठवाडा संपन्न होईल.साखरेसह दाळ आदी शेतीतील  उत्पादने मागणीपेक्षा जास्त झाल्याने दर मिळू शकत नाही यावर उपाय करतांना इथेनॉल निर्मितीला प्राधान्य देण्याचे धोरण केंद्राने अवलंबिले असून साखर कारखान्यामध्ये त्या दृष्टीने प्रकल्प उभारण्यास चालना दिली जात आहे.इथेनॉलपासून बायोप्लास्टीक तयार करता येत असल्याने त्याची मोठी मागणी पूर्ण करण्यासाठी शेतक-याच्या उत्पन्नात वाढ होईल असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
लोकार्पण सोहळयामध्ये प्रधान मंत्री आवास योजना,कौशल्य विकास योजनांच्या लाभार्थ्याचा प्रमाणपत्र देऊन मंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रातिनिधीक स्वरुपात प्रधानमंत्री आवास योजनेतील पाच लाभार्थी, कौशल्य प्रशिक्षण पूर्ण करुन रोजगार मिळालेले पाच लाभार्थी यांचा समावेश होता. यावेळी आमदार सुरेश धस,आ.लक्ष्मण पवार,माजी आ. गोविंद केंद्रे आदींनी भाषणाव्दारे विचार व्यक्त केले.
*-*-*-*-*-*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा