बुधवार, १३ जून, २०१८


                           येरे घना                                  ललित लेख
त्याची वाट पाहत ती किती तरी दिवसापासून आस लावून बसली होती त्याच्या आगमनाकडे, एखद्या दगडी पुतळयासारखी डोळे सताड उघडे ठेवून. त्याच्या  येण्याची चाहूल लागली की, ती खूप खूप आनंदून जायची. मनमोराच्या पिसा-यावर अनेक रंग उमलुन यायचे. आकाशात ढगांनी गर्दी केली की तीला वाटायचे आज मात्र तो नक्कीच येईल, तीला कवेत घेण्यासाठी. त्याच्या अलिगंनाने ती हर्षभरित होऊन गीत गुण गुणू लागेल या अपेक्षेत. सकाळच्या ढगाळ वातावरणाने तिच मन  प्रफुल्लीत होऊन पावसाच गाण होऊन जायचे.
                                                                                                   बेबीसरोज ग.अंबिलवादे,(लोळगे)
                                                                                                         जिल्हा माहिती कार्यालय,
                                                                                                                     बीड
                                                                                                        भ्रमणध्वनी 9921136185
 सकाळीच आकाशात ढगाच्या डोंगरानी गर्दी केली होती. पुर्वदिशेला उगवणा-या सुर्याचेही तिला दर्शन झाले नव्हते. आकाशाला गडद काळया वस्त्रांनी व्यापून टाकल्याने सुर्यदेव आपल्या तेजाची कोवळी किरणे आपल्या प्रियतमेला देऊ शकत नव्हता. ढगांच्या आडव्या तिडव्या डोगंराच्या पर्वतरांगा तपस्वयाच्या जटा पिजांरलेल्यासारख्या दिसत होत्या. क्षणात ती ढगांची मैफल दूर दूर पळतांना पाहून ती हर्षभरित होऊन त्याच्यांकडे टक लावून पाहत रहायची. त्यांचा हा पाठशिवनीचा खेळ तीला खूप खूप आवडायचा. पण वा-याच्या जोराने ती ढगांची माळ दूर दूर निघून जायची आणि त्या जागेवर काळया पट्टयाची चादर तयार व्हायची. काळया चादरीबरोबरच  ढगातुन कड कडाट करणारी विजांची सौदामिनी घनघोर  गर्जनाचा आवाज करत तीला घाबरवून टाकायची. देवेंद्राची बलशाली शक्ती तिचा लवाजमा घेऊन पृथ्वीवर निघायची, तेव्हा ढोलताशाच्या गजरात ती  विजाचा लखलखाटासह चमकून जायची.
तीला असं वाटु लागायची की,  तो असा अक्राळ विक्राळ  रुप घेऊन कोसळेल. त्याच्या टपो-या थेबांच्या अल्हड स्पर्शाच्या कल्पनेने तीची काया रोमांचित होऊन जायची. घनगर्द मेघातुन जराशी प्रकाशाची किनार लेवून आलेली दिसली की, तीला वाटायचे माझा सखा आकाशातील त्या काळया किनारी किनखापी गलफाच्या पाठीमागे लपला आहे. त्याची किनार दूर सारुन तो पावसाच्या थेंबातुन नक्कीच खाली येईल. वासुकी सर्पाच्या फुत्कारासारख्या पर्जन्यधारा धरणीवर कोसळतील अन् हे उत्कट उर्मीचे क्षण कांचन डबीत बंदीस्त करुन ठेवील, असे विचार ती मनाशीच करीत झाडाच्या बुथ्यांशी उभी होती. त्याला अंगावर झेलण्यासाठी. त्याचा स्पर्श संर्पुण अंगाला व्हावा या उद्देशाने तिन आज किमती छत्रीही अडगळीत भिरकावून दिली होती.
तीला वाटत होते. त्याच्या कर्तव्याला तो कधीच चुकणार नाही. अन् दरवर्षीच तो असाच अचानक येतो आणि तीला अचंबित करतो. तिच्या आंगणात,परसबागेत,घराच्य खिडकीतून बळजबरीने मधे घुसून तिच्यावर वर्षाव करतो. तिच्या तनामनाला न्हाऊ घालतो. अन् पून्हा निघून जातो त्याच्या मुक्कामाच्या गावी, कुठलाच पत्ता  न देता. यावेळेस मात्र त्याने दोन महिन्यापासून तिचा छळ मांडला होता. तिला येण्याचे संकेत देत तो मात्र दुस-याच मार्गाने निघुन जात होता. ती हिरमुसली होऊन त्याचा माग काढत काढत दाही दिशा फिरत होती पण त्यावा थांगपत्ता मात्र कुठेच लागत नव्हता. त्याला पत्र पाठवून लवकर परत बोलावावे म्हटले तर ती  त्यचा पत्ता घ्यायलाच विसरली होती.
ती आता कुंठीत झाली होती. बंद पडद्याच्या पापण्यात तिन थोडासा पाऊस साठवला  होता. तोच आता थेंबाच्या रुपाने तिच्या आरक्त गालावर पाझरला होता,तिन  हलकेचे टिपले ते अश्रुचे थेंबअन म्हणाली माझ्या डोळयतला पाऊस वाहुन जातोय माझ्या गालावरुन, तरीही तुला यावस वाटत नाही का? माझ्या भेटीला, असा का? रुसलासरे वरुणराज्या माझ्यावर आणि माझ्या सर्वच शेतकरी राज्यांवर? तुला काहीच दया येत नाही कारे  त्यांची? माझ्यावर रुसला असेल तर मला नको घेऊ तुझ्या मिठीत पण माझ्या इतर बांधवांना तरी असा त्रास देऊ नकोस. मी राहील तुझ्याविना अशीच किती तरी काळ तिष्ठत उभी पण या मुक्या प्राण्याचेही तुला काहीच वाटत नाही का? बघ ती पशु पक्षी,मुकी जनावरे कशी तडफडताहेत तुझ्या थेंबावाचून, चातकही शिणला आहे तुझ्या आगमनाची वाट पाहून, त्याचा प्राण निघू पाहत आहे ताहनेने, हिरवळ करपून गेलीय तुझ्या अठवणीने ती जीव सोडण्याच्या मार्गावर आहे, पक्षाचे थवे कोरडा पाणवठे पाहून फिरताहेत वनवन,ताहन न भागल्याने जाताहेत मृत्यूच्या कवेत. वाडया वस्त्यावर पाण्याची भांडी घेऊन लेकर फिरताहेत पाण्याच्या शोधात पण पाण्याचा थेंबही प्यायला मिळत नाही. घोटभर पाणीही नाही घसा कोरडा पडला तर प्यायला. तेव्हा त्यांच्या  डोळयाचे पाझरही आटलेत कोरडी ठणठणीत  झालीत पाणी तरी कुठून गाळणार डोळयातुन. कुठून आणतील पाणी पिण्याला. धरणाची काया उघडी पडली, नदीची माया तर केव्हाच आटली, कोरडेठाक पात्र पाहून किनारेही फिरवाताहेत पाठ,हिरवळीने नटलेला पर्वताचे सौदर्य पडले आहे फिके त्यामुळे दगडगोटयाच्या सोबतीशिवाय कोणीच नाही देत त्याला साथ. हिरवळच नसल्याने माणसही पळताहेत दूर शोधताहेत कुठे मिळतो का? अशेचा अंधकसा किरण.
दोन महिने उलटली तरी तु मात्र आहेस बिनधास्त. तुला आकाश सोडून यावच वाटत नाही का? उजाड धरतीचा पाहण्यास वास. तु नुसताच दिसतोस, ढगांच्या आड लपतोस, अस वाटत तू किती किती  धावत येशील,कुठलाही धरबंध न ठेवता बेभान होऊन कोसळशील, विहीरी,बारवा तुडंब भरवशील, नदीच्या पात्रात धडकून तिची ओटी पाण्याने भरवशिल, डोगर रागांत ओहळ होऊन वाहशील पण तुला ढगातुन खाली उतरवावस वाटत नाही. कारण या माणुस नावाच्या प्राण्यांनी खूप छळल आहे तुला. तुझे सोबती वृक्षराज यांच्या कतली करुन मांडला लिलाव. कारखाण्याच्या  धुराने कोंडलाय तुझा श्वास,प्ल्स्टीकच्या कच-याने केलाय तुझा घात, कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी केमीकलने होतोय तुझ्यावर विषारी मारा, म्हणून तर तु रुसला नाहीसनारे आमच्यावर पण तु समजून घे अन् या स्वार्थी माणसाला  माफ करुन ये पुन्हा तुझ्या वंसूधरेला चिंब चिंब भिजवण्यासाठी,  दाखव तुझा निस्वार्थीपणा अन कर सर्वावर धुव्वाधार वर्षाची वृष्टी. आरे माणूस कसाही जगेल पण तुझ्या सानिध्यात, तुझ्या जीवावर जगणारे मुकी जनावरे,पशु पक्षी काय खातील पितील याचा तरी विचार कर, माणसासाठी नाही पण त्यांच्यासाठी तरी सोड तुझा रुसवा, घे कुशीत या धरनीला अन् भिजव प्रेमाने पुन्हा नव्याने बहरण्यासाठी.
 नको देऊ हुलकावणी ,नको फिरवून जाऊस तोंड, करुन टाक बरसात धुमधडाक्यात, आता आम्ही लावणार आहोत वृक्ष असख्यांत, तुझी अवकृपा होऊ नये म्हणून शाहणी होणार आहे माणूस जात. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी,तुझी कृपा वेळेवर होण्यासाठी आम्ही सरसावलो आहोत वृक्ष लावण्यास. तेव्हा तू ये धो धो अवकळागत अन् घे तुझ्या प्रियतमेला तुझ्या बहुपाशात,तिचे डोळे त्रसले आहे तुझा अवखळपणा पाहण्यास,कायाही शिणली आहे तुझ्या अंलिगणास.आता लावू नकोस वाट पाहण्यास नाही तर विश्वासच नाही राहणार तुझ्यावर तूझ्या या वेडया वंसुधरेचा, ती भेगाळतच जाईल अन निकृष्ट होईल तृणावाचून निर्जिव होईन मग कुणाच्या कुशीत तु ठेवशील मान, आता सोड तु अबोला अन् ये तिचा हात हाती घेण्यास. असा नुकताच लंपडाव खेळु नकोस ढगांच्या मेळयात, तुझी अस धरुन बसलीय ती पाहत आभाळात,करुन दृष्टीने अस लावून, म्लान वदनाने तुझ्याकडे पाहत,आता देऊ नकोस तीला हुलकावणी,होऊदे तुझा राग अनावर ये गर्जना करुन अन् घाल धिंगाना पृथ्वीच्या माथ्यावर जलमय करुन टाक तिची कुस,होऊदे अबादानी बळीराजाची घर,येरे घना न्हाउ घाल त्रासलेल्या जीवानां.   




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा