मंगळवार, १६ जानेवारी, २०१८

थकीत मुद्रांक शुल्काची रक्कम
तात्काळ जमा करण्याचे आवाहन
        बीड,दि, 16:- बीड जिल्हयातील नगरपालीका,नगर परिषदा,ग्रामपंचायत,कृषी उत्पन्न बाजार समितींनी वाटप केलेल्या गाळयांबाबत केलेल्या भाडेपटटी करारनाम्याची नोंदणी करणे भारतीय नोंदणी अधिनियम 1908 चे कलम 17 नुसार अनिवार्य आहे. या दस्ताऐवजास महाराष्ट्र मुद्रांक  अधिनियम 1958 चे अनुसूची 1 मधील अनुच्छेद 36 नुसार मुद्रांक शुल्क भरणे आवश्यक आहे. मात्र, अशा प्रकारच्या दस्ताऐवजाची रितसर नोंदणी न केल्यामुळे मिळकत धारकांच्या हितसंबधांना कायद्याने संरक्षण मिळत नाही. व  करारनाम्यावर आवश्यक मुद्रांक शुल्क न लावल्यामुळे अशा दस्तऐवजास संरक्षण मिळत नाही. तसेच दस्तास मुद्रांक न लावल्यामुळे शासन महसूलाचे नुकसान होते. मुद्रांक चुकविलेला, थकीत मुद्रांक शुल्काच्या रकमेचा तात्काळ भरणा करण्यात यावा, असे सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी बीड प्रकाश खोमणे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे आवाहन केले आहे.
            नगर पालीका, नगर परिषद, ग्रामपंचायत, कृषी उत्पन्न बाजार सिमती यांच्याकडून प्राप्त झालेल्या करारनाम्यांवर आवश्यक ते मुद्रांक शुल्क भरले गेले नसल्याची बाब निदर्शनास आली असल्याने सदर दस्तऐवजास मुद्रांक जिल्हाधिकारी,बीड तसेच दुय्यम निबंधक कार्यालयाच्या स्तरावरुन संबधित गाळे धारकांना मुद्रांक शुल्क भरणे बाबत नोटीसीव्दारे कळविण्यात आले आहे.  जिल्हयातील सर्व कार्यालय प्रमुखावर त्यांचे कार्यालयात निष्पादीत होणाऱ्या वेगवेगळया करारनाम्याच्या दस्तएवजावर मुद्रांक शुल्क वसूल करण्याची जबाबदारी नव्याने समाविष्ट झालेल्या महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958 (सुधारित 2015) चे कलम 10(ड) प्रमाणे टाकण्यात आलेली असत्याने त्यानुसार सर्व कार्यालय प्रमुखांनी योग्य मुद्रांक शुल्क वसुल करण्याची खबरदारी घ्यावी.
            लिव्ह अँड लायसेन्सचे दस्तऐवजांची नोंदणी करणे देखील नोंदणी कायदयानुसार अनिवार्य आहे. सदर दस्तएवजास महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958 चे अनुसूची -1 मधील अनुच्छेद 36 (अ) नुसार मुद्रांक शुल्क देय आहे. सर्व जनतेस आवाहन करण्यात येते की, त्यांनी लिव्ह ॲण्ड लायसेन्सच्या दस्ताऐवजास याथेचित मुद्रांक शुल्क भरुन त्याची दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी करता येईल. तसेच लिव्ह ॲण्ड लायसेन्सच्या दस्ताऐवजाची ऑनलाईन पध्दतीने नोंदणी घरबसल्या करण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून त्या करिता  www.igrmaharashta.gov.in या संकेत स्थळावर  दस्ताऐवजाची नोंदणी करता येईल.  या सुविधेचा जनतेनी लाभ घ्यावा.

            राज्य शासनाच्या महसुलात वाढ होण्याच्या दृष्टीने नोंदणी महानिरिक्षक व मुद्रांक नियत्रंक यांनी औरंगाबाद विभागाचा आढावा घेतला, त्यावेळी मुद्रांक शुल्क वसुलीबाबत सूचना दिल्या आहेत. ज्या संबधित व्यक्ती,गाळेधारक,संस्था यांनी मुद्रांक शुल्क भरण चुकविला आहे त्यांचा शोध घेऊन चुकविलेल्या मुद्राक शुल्काची रक्कम वेळेत जमा न केल्यास महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958 मधील कलम 46 नुसार संबंधिताच्या जंगम व स्थावर मालमत्तेवर टाच आणून जप्तीची कार्यवाही करण्यात येईल असे  प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा