मंगळवार, १४ नोव्हेंबर, २०१७

प्रधानमंत्री सुरक्षीत मातृत्व अभियानाचा नायगाव येथे शुभारंभ



            बीड, दि.14:-प्रधानमंत्री सुरक्षीत मातृत्व अभियानाचा दि.9 नोव्हेंबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, नायगाव येथे जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती सविता गोल्हार यांच्या अध्यक्षतेखाली व आरोग्य व शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.  
            गरोदर मातांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दरमहा 9 तारखेला स्त्री रोग तज्ञाच्या सेवा या मोहिमेच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. खाजगी व्यवसाय करणारे एकुण 65 स्त्री रोग तज्ञ हे गरोदर मातांची मोफत आरोग्य तपासणी करुन गरोदर मातांवर उपचार करणार आहेत. तसेच अतिजोखमीच्या माता शोधून त्यांना उपचार तसेच योग्य वेळी संदर्भ सेवा देऊन सुरक्षीत बाळंतपण कशा पध्दतीने होईल जेणेकरुन माता व बालक सुरक्षीत राहील या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत. प्रत्येक गरोदर मातेची किमान एक सोनोग्राफी मोफत करण्यासाठी जिल्ह्यातील एकुण 39 डॉक्टरांनी सहमती दर्शविली असून त्यांच्या खाजगी दवाखान्यात गरोदर मातांची मोफत सोनोग्राफी करण्यात येणार आहे.
            या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कवठेकर, पं.स. सदस्य देविदास शेंडगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार, जिल्हा माता व बाल संगोपण अधिकारी डॉ.संजय कदम तसेच परिसरातील विविध गावचे सरपंच व पदाधिकारी उपस्थित होते.

-*-*-*-*-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा