शुक्रवार, १० नोव्हेंबर, २०१७

जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीकडील प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावीत - जिल्हाधिकारी एम.डी.सिंह



          बीड, दि.10:-जिल्ह्यातील नागरिकांनी भ्रष्टाचारासंबंधी केलेल्या तक्रारीचे वेळेवर निराकरण होणे गरजेचे असल्याने जिल्हा भ्रष्टाचार ‍निर्मुलन समितीकडील प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावीत असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे अध्यक्ष एम.डी.सिंह यांनी केले.    
          जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीची बैठक जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे संपन्न झाली. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) महेंद्रकुमार कांबळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री.मिसाळ यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.
          पुढे बोलताना जिल्हाधिकारी श्री.सिंह म्हणाले की,  जिल्ह्यातील शासकीय अधिकारी- कर्मचाऱ्याविरुध्द प्राप्त होणाऱ्या तक्रारीबाबत पाठपुरावा करण्यासाठी जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समिती स्थापन करण्यात आलेली आहे. संबंधितांच्या तक्रारीचा अहवाल वेळेत द्यावा यासाठी संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी अशी सुचनाही त्यांनी केली. यावेळी त्यांनी प्राप्त झालेल्या 11 तक्रारीवर संबंधित कार्यालयाकडून प्राप्त अहवालाची चौकशी करुन योग्य त्या सूचना केल्या.
          शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्याविरुध्द भ्रष्टाचारासंबंधी तक्रार असल्यास समितीसमोर उपस्थित राहून लेखी स्वरुपात मांडावी असे आवाहन करण्यात आल्याने काही तक्रारदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आपली तक्रार जिल्हाधिकारी श्री.सिंह यांच्यासमोर मांडली. त्यावर जिल्हाधिकारी श्री.सिंह यांनी संबंधित विभागाच्या प्रमुखांना संबंधितांच्या तक्रारीविषयी जलदगतीने तक्रार निवारण करण्याच्या सूचना केल्या. या बैठकीस विविध विभागाच्या विभागप्रमुखासह, अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

-*-*-*-*-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा