बुधवार, ९ ऑगस्ट, २०१७

जिल्हा रुग्णालयात तंबाखु मुक्त अभियान; सेवन करणाऱ्यांकडून पाच हजार रुपये दंड वसूल



     बीड, दि. 9 :-  जिल्हा रुग्णालयामध्ये तंबाखु सेवन करणाऱ्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात सुरुवात केली असून एप्रिल 2017 पासुन तंबाखु मुक्त अभियानाने ही मोहिम हाती घेतली आहे. दि.9 ऑगस्ट 2017 पर्यंत ही दंडाची रक्कम पाच हजार रुपयाच्या घरात गेली आहे.

      शासन नियमानुसार सर्व शासकीय कार्यालये, रुग्णालय, शैक्षणिक संस्था इत्यादी ठिकाणी तंबाखु सेवन करण्यास मनाई करणारे फलक दर्शनी ठिकाणी लावण्याच्या सुचना आहेत. शासकीय रुग्णालय परिसरात तंबाखू खाणाऱ्यावर लागलीच कारवाई करण्यात येत आहे. अगदी नेहमीप्रमाणे कार्यवाहीची भिती फक्त भिंतीवरच राहील अशा आवेशात असणाऱ्यांना मात्र यावेळी चांगलाच झटका बसला आहे. तंबाखुजन्य पदार्थ खाऊन थुंकणाऱ्यास 200 रुपये दंड ठेवण्यात आला असून ही कारवाई 13 एप्रिल 2017 पासून आजतागायत सुरु असून यातून  5 हजार रुपये इतका दंड वसूल  करण्यात आला आहे. यामुळे रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांना चांगला धसका बसला आहे. बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी तंबाखू मुक्त अभियान अधिक तीव्र करण्याचा मानस व्यक्त केला तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी जिल्हा रुग्णालयातील कक्ष क्र.12 ला भेट देवून समुपदेशनाने तंबाखू सोडावी आणि तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनापासून दूर रहावे असे आवाहनही केले आहे. असे जिल्हा शल्य चिकित्सक, बीड यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा