गुरुवार, ३१ ऑगस्ट, २०१७

बिंदुसरा नदीच्या पुलावरुन होणारी वाहतूक बंद; जनतेने सहकार्य करण्याचे प्रशासनाचे आवाहन

बिंदुसरा नदीच्या पुलावरुन होणारी वाहतूक बंद;
जनतेने सहकार्य करण्याचे प्रशासनाचे आवाहन

          बीड, दि. 31 :-  प्रकल्प संचालक,भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण,औरंगाबाद यांनी कळविल्यानुसार बिंदुसरा पुलावरून होणारी हलकी व जड वाहनांच्या वाहतूकीमुळे कुठल्याही प्रकारची दुर्घटना तसेच जीवित व वित्त हानी टाळण्याचे दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून पर्यायी व्यवस्था होईपर्यंत या पुलावरून होणारी वाहतूक तूर्तास बंद करण्यात आली आहे याबाबत जनतेने सहकार्य करावे असे प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे.
बीड शहरातील बिंदुसरा नदीवरील पूल जुना व वाहतुकीसाठी धोकादायक असल्याने त्यावरील हलकी व जड वाहतूक चालू ठेवणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे पुलावरून जाणारी वाहतूक संपुर्णपणे बंद करून या महामार्गावरील उस्मानाबादकडून येणारी जड अवजड वाहने मांजरसुंबा येथून तसेच औरंगाबाद कडून येणारी जड अवजड वाहने गेवराई तालुक्यातील गढी येथुन वळविणेबाबत प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण प्रोजेक्ट इम्प्लीमेंटेशन युनिट (NHAI-PIU) यांचे दि. २४ सप्टेंबर २०१६ रोजीच्या पत्रान्वये कळविले आहे.
          राष्ट्रीय महामार्ग क्र.२११ या महामार्गावर बीड जिल्ह्यात मांजरसुंबा येथे दि.27 ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे बिंदूसरा नदीवरील तयार केलेला तात्पुरता वळण रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे या वळण रस्त्यावरून जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. ही वाहतूक मांजरसुंबा-पाटोदा-बीड मार्गे वळविण्यात आली आहे. बीड शहरात बिंदुसरा नदीवर ८४ वर्षे जुना मोठा पूल आहे त्याचे आयुष्यमान, कार्यकाल संपलेला असून या ठिकाणी नवीन पूल बांधण्यासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण,मुख्यालय नवी दिल्ली यांनी दि.६ जुलै २०१७ रोजी तत्वतः मान्यता दिल्याने पावसाळा संपल्यानंतर बिंदुसरा नदीवर नवीन पूल बांधण्याचे काम लवकरात लवकर हाती घेण्यात येईल असे प्रकल्प संचालक,भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण कळविलेले आहे.
         

-*-*-*-*-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा