रविवार, ४ जून, २०१७




शिक्षकांनी मुलांच्या हस्ते झाडे लावून त्यांचे संवर्धन करावे
                                           - विभागीय आयुक्त डॉ.भापकर

बीड, दि. 4 :- वृक्ष लागवडीसाठी बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बालाघाट डोंगररांगा तसेच टेकड्या असून या टेकडी जवळील गावच्या शाळेतील शिक्षकांनी मुलांच्या हस्ते झाडे लावून त्यांचे संवर्धन करावे असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी केले.
बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित 4 कोटी वृक्ष लागवडीसंदर्भात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी राम गगराणी, मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, अतिरिक्त विभागीय आयुक्त विजयकुमार फड, विभागीय वन अधिकारी श्री.सातपुते, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) महेंद्रकुमार कांबळे,  अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना श्री.भापकर म्हणाले की, आपण आपली मानसिकता बदलून वृक्ष लागवड करावी मांजरसुंबा घाटात वृक्ष लागवड करुन ते उजाड डोंगर हरित कसे होतील याची काळजी घ्यावी. मनरेगाच्या माध्यमातून लावलेली झाडे कशी जगतील याची परिपूर्ण काळजी घेण्यात यावी. ही झाडे जगविण्याची ताकद मनरेगात आहे यामधून आपण वृक्षाचे संवर्धन करु शकतो. बीड जिल्ह्यात खुप डोंगर आहेत तेथे आपण झाडे लावून डोंगररांग हिरवीगार कशी होईल याची काळजी घ्यावी. शिक्षकांनी आपल्या शाळेतील प्रत्येक मुलाला एक झाड लावायला प्रोत्साहित करावे यासाठी मुलांचा संवाद झाडांशी, हवेशी, पाना-फुलांशी, डोंगररांगाशी कसा होईल यासाठी प्रयत्न करायला हवीत. डोंगराजवळच्या शाळांनी तेथील डोंगरावर झाडे लावून डोंगरे हिरवीगार करावीत. बीड जिल्ह्यात अंदाजे 6 लक्ष मुले पहिली ते 12 वी पर्यंत शिक्षण घेत आहेत. टेकडीवर मुलांनी झाडे लावावीत आणि आठवड्यातून दोनदा -तिनदा त्याला पाणी घालून वृक्ष संवर्धन करावे या माध्यमातून आपल्याला 6 लक्ष झाडांचे संवर्धन करणे सोपे होईल असेही ते म्हणाले.
बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मजूर असून ते काही काळ स्थलांतर करत असतात त्यामुळे त्यांच्या पाल्याच्या शिक्षणावर परिणाम होवून शाळाबाह्य मुलांची संख्या वाढू नये याकरीता शिक्षकांनी जागरुक असावे. तसेच फक्त शिक्षण न देता त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण कसे देण्यात येईल याकडे महत्वपूर्ण नजरेने पाहणे गरजेचे आहे. तसेच शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेतील वातावरण कसे प्रसन्न राहिल याची काळजी घ्यावी अशी सुचनाही त्यांनी यावेळी केली.
प्रास्ताविक विभागीय वन अधिकारी श्री.सातपुते यांनी केले यामध्ये त्यांनी 50 कोटी वृक्ष लागवड हा कार्यक्रम शासनाने पुढील तीन वर्षात राबविण्याचे ठरविले असून आपल्या विभागीय आयुक्तांनी चला गावाकडे जाऊ, ध्यास विकासाचा घेऊ हे अभियान राबविण्याचे ठरविले असून त्यात वृक्ष लागवड कार्यक्रमाचा समावेश केला आहे. असे सांगितले.

यावेळी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी बाबासाहेब उजगरे, खापरटोनचे शिक्षक श्री.किर्दत आणि रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार विभागीय आयुक्त श्री.भापकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला. या बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, रोटरी क्लब व विविध कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.                                                     -*-*-*-*-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा