गुरुवार, १ जून, २०१७

भ्रष्टाचारमुक्त कारभाराचे केले आवाहन गावांच्या सर्वांगिण विकासासाठी जिल्हा परिषद हे प्रभावी माध्यम - पालकमंत्री पंकजा मुंडे यांचे प्रतिपादन








बीड, दि. 1 :- बीड जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी गावांच्या सर्वांगिण विकासाला अत्यंत महत्व असून यासाठी जिल्हा परिषद आणि त्यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध विकास योजना हे प्रभावी माध्यम आहे. याचा सर्व सदस्यांनी पुरेपूर उपयोग करावा असे आवाहन  राज्याच्या ग्रामविकास व महिला व बालविकासमंत्री  तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी केले.
 बीड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध विभागाच्या विकास योजनांचा आढावा पालकमंत्री मुंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेतला. यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीस खासदार डॉ. प्रितम मुंडे, जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार, उपाध्यक्षा जयश्री मस्के, आमदार जयदत्त क्षीरसागार, आ. विनायक मेटे, आ. आर.टी. देशमुख, आ.  संगीता ठोंबरे, आ. लक्ष्मण पवार तसेच प्रभारी जिल्हाधिकारी राम गगराणी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांशी संवाद साधताना पालकमंत्री मुंडे म्हणाल्या की, आपल्या गावाचा आणि जिल्ह्याचा विकास करण्याची संधी जनतेने सदस्यांना दिली आहे. त्यांनी ही सुवर्णसंधी मानुन आपल्या भागात विकासाच्या योजना प्रभावीपणे राबवाव्यात. विकास हा केंद्रबिंदु मानुन काम केल्यास गावे समृध्द होती. ग्रामीण जनतेचे प्रश्न समजावून घेतले आणि पुढाकार  घेऊन कामे  हाती घेतली तर जनता नक्कीच तुम्हाला साथ देईल. यासाठी सदस्यांनी शासनाच्या योजनांची माहिती सतत घेतली पाहिजे.
जिल्हा परिषदेचा कारभार विकासाभिमुख आणि भ्रष्टाचारमुक्त असण्यावर भर द्यावा अशी सूचना करुन पालकमंत्री मुंडे म्हणाल्या की, आपल्या जिल्हा परिषदेने हागणदारीमुक्तीच्या दिशेने सुरु केलेले काम कौतुकास्पद आहे. मात्र प्रत्येक लोकप्रतिनिधींनी मनावर घेतले तर जिल्हा हागणदारीमुक्त व्हायला वेळ लागणार नाही. यासाठी झटून कामाला लागले पाहिजे. 17 टक्क्यांवरुन आपण 57 टक्के शौचालय बांधकामाचा  पल्ला गाठला आहे. औरंगाबाद विभागात आपल्या जिल्ह्याने सर्वात जास्त शौचालये बांधण्याची कार्यवाही केली आहे. ही बदलाची नांदी आहे. सर्व लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदारसंघातील प्रत्येक गावापासून हागणदारी मुक्तीचा विडा उचलला तर नजिकच्या काळात आपला जिल्हा संपुर्ण हागणदारीमुक्त होईल अशी आशाही श्रीमती मुंडे  यांनी व्यक्त केली.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकासाची कामे करीत असताना पक्षीय राजकारण दूर ठेवण्याचा सल्ला देत पालकमंत्री मुंडे म्हणाल्या की, जिल्ह्यातील जुन्या व पडीक शाळांच्या इमारतींच्या नुतनीकरणावर भर देण्याची गरज आहे. यासाठी खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे कामकाज सुरु आहे. अशा शाळांच्या दुरुस्तीसाठी लोकप्रतिनिधींनी आपला निधी प्राधान्याने द्यावा याशिवाय सीएसआर फंड आणि इतर माध्यमातूनही निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.  जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या मालमत्तेचा सविस्तर आढावा घेऊन अहवाल सादर करावा असे निर्देशही पालकमंत्री मुंडे यांनी दिले.
नागरिकांच्या सेवासुविधांसाठी एक खिडकी योजनेसारखा उपक्रमाची अंमलबजावणी करावी असे सूचित करुन त्या म्हणाल्या की, 14 वा वित्त आयोगामध्ये गाव विकास आराखडे झाले आहेत. गावांच्या गरजा लक्षात घेऊन आमदारांनी जिल्हा परिषद गटनिहाय बैठक घेऊन नियोजन  करावे. त्यानुसार निधीचे वितरण करण्यात येईल. पाणी पुरवठा योजनांच्या भ्रष्टाचार प्रकरणांची चौकशी करण्याचे तसेच शाळा बांधकामातील गैरव्यवहारांची चौकशी करण्याचे निर्देश पालकमंत्री मुंडे यांनी दिले.
          पाणी-स्वच्छता-रस्ते आणि आरोग्य या चार क्षेत्रातील विकास कामांना प्राधान्य दिले गेल्यास जिल्ह्यातील जनता अधिक सुखी होईल. यासाठी सर्वांनी  प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्रत्येक जिल्हा परिषद सदस्यांनी आपल्या क्षेत्रातील 1 कोटी रुपयांच्या एका रस्त्याची निवड करुन प्रस्ताव पाठवावा. त्याचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून करण्यात येईल अशी घोषणाही पालकमंत्री मुंडे यांनी यावेळी केली. तसेच जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर 898 वरुन 927 एवढा वाढल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.
या बैठकीत सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी विविध विकास योजनेच्या माहितीचे सादरीकरण केले. खासदार, आमदार, आणि इतर मान्यवरांनी चर्चेत सहभाग घेऊन उपयुक्त सुचना केल्या. या बैठकीस जिल्हा परिषदेचे सभापती संतोष हांगे, शोभा दरेकर, राजेसाहेब देशमुख, युधाजित पंडीत यांच्यासह पंचायत समिती सभापती, जि.प. सदस्य, तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, गटविकास अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी पालकमंत्री मुंडे यांच्या हस्ते स्वच्छ भारत मिशनच्या " दरवाजा  बंद तर आजारपण बंद" या घडीपत्रिकेचे विमोचन करण्यात आले.

-*-*-*-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा