मंगळवार, ११ एप्रिल, २०१७

डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त शांतता समितीची बैठक उत्सव शांततेत साजरे करण्याची परंपरा कायम ठेवावी - जिल्हाधिकारी नवल किशोर राम




       बीड, दि. 11 :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शांततामय वातावरणात साजरी करण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करुन जिल्हयात होणारे उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरी करण्याची परंपरा यावर्षीही कायम ठेवावी असे प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.
          जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीची सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा शांतता समितीची बैठक जिल्हाधिकारी राम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, अपर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे, सहाय्यक पोलीस अधिक्षक विशाल आनंद, रिपाई युवक प्रदेशाध्यक्ष पप्पु कागदे, उपविभागीय अधिकारी विकास माने, महेंद्रकुमार कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
          यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी राम म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यासाठी उत्सव समित्यांचे पदाधिकारी आणि नागरिकांशी चर्चा करुन प्रशासनाने योग्य नियोजन केले आहे.  सर्व संबधित विभागांना त्यांच्या जबाबदाऱ्या नेमुन दिलेल्या असून त्या योग्य रितीने पार पाडण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत. जयंतीच्या मिरवणुकीच्या वेळी कोणत्याही प्रकारची अनुचित घटना न होण्यासाठी समित्यांचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. आपल्या आसपास काही अनुचित प्रकार आढळून आल्यास तात्काळ पोलीस आणि प्रशासनास अवगत करावे. तसेच उत्सव कालावधीमध्ये सोशल मिडीयाबाबतही अधिक जागरुक रहावे. असेही जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी सांगितले.
          जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी डीजे वाजविण्याची डेसिबल मर्यादा आणि वेळेचे पालन, शहर स्वच्छता, विद्युत पुरवठा, पोलीस बंदोबस्त, वाहतुक नियमन, भेसळयुक्त पदार्थांची विक्री, अवैध दारु विक्री, महिला व मुलांच्या सुरक्षेसाठी दामिनी  पथकांची नियुक्ती असे यासंदर्भात केलेल्या नियोजनाची माहिती दिली.
          यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक जी. श्रीधर म्हणाले की, जयंती उत्सवाच्या कालावधीत कोणत्याही प्रकारची अप्रिय घटना घडणार नाही यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर पोलीस अधिकारी यांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. मिवरणुकीच्या वेळी वाहतुक कोंडी न होण्यासाठी वाहतुक वळविण्यात येणार आहे असे सांगून पोलीस विभागामार्फत केलेल्या नियोजनाची माहिती दिली व जयंती उत्सव कालावधीत नागरिकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले.

          यावेळी रिपाई युवक प्रदेशाध्यक्ष पप्पु कागदे तसेच जिल्ह्यातील जयंती उत्सव समित्यांचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांनी चर्चेत भाग घेऊन उपयुक्त सुचना केल्या. या बैठकीस सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय  पोलीस अधिकारी, तहसीलदार, जयंती उत्सव समित्यांचे अध्यक्ष, पदाधिकारी तसेच अधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा