सोमवार, २३ जानेवारी, २०१७

पिंपळनेरच्या आश्रमशाळेतील अत्याचाराच्या प्रकरणी समाजकल्याणची कडक कारवाई



                   बीड, दि. 23 :-  सिंदफणा प्राथमिक आश्रमशाळा, पिंपळनेर ता.शिरुर जि.बीड या विभाभज आश्रमशाळेतील मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या तक्रारीबाबत सहाय्यक आयुक्त समाजकल्याण बीड यांनी सविस्तर चौकशी करुन अहवाल सादर केला आहे.
             दि.12 जानेवारी 2017 रोजी ॲड. श्रीमती वर्षा देशपांडे दलित महिला विकास मंडळ, सातारा यांनी प्राथमिक आश्रमशाळा सिंदफाणा ता.शिरुर (कासार) जि.बीड येथील मुलीवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराबाबत त्वरीत चौकशी करुन दोषीवर कारवाई व्हावी व आश्रमशाळेतील मुलींना सुरक्षितता मिळावी असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, बीड कार्यालयास लेखी पत्र दिले होते.
             त्यानूसार दि.31 जानेवारी 2017 रोजी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,बीड कार्यालयामार्फत शाळेला प्रत्यक्ष भेट दिली. अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा, शिरुर (कासार) जि.बीड या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अस्मिता जावळे यांच्यामार्फत शाळेतील प्रवेशित मुलींची विषयांकित प्रकरणी विचारपूस करण्यात आली. मस्के डी.एन. हे मुलींना स्नान घालणे तसेच अत्याचार करत असल्याचे व के.व्ही.उनवणे हे शाळेत दारु पिऊन येत असल्याचे मुलींना सांगितले असे मुख्याध्यापिका श्रीमती जावळे यांनी लेखी दिल्यानूसार महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली,1981 मधील कलम 28 मधील तरतुदीस अनुसरुन नैतिक अध:पात या गैरवर्तणीकीमुळे मस्के डी.एन.सहशिक्षक यांना तात्काळ निलंबित करुन त्यांच्याविरुध्द बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम 2012 मधील तरतुदीनूसार संबंधित पोलीस स्टेशनमध्ये तात्काळ गुन्हा नोंदविणेबाबत कार्यवाही करावी तसेच उनवणे के.व्ही. सहशिक्षक यांच्याविरुध्द महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली 1981 मधील कलम 30 नूसार कार्यवाही करणेबाबत संबंधित संस्थेस निर्देश देण्यात आले.

             त्यानूसार अध्यक्ष/सचिव, संग्राम सेवाभावी संस्था, पिंपळनेर ता.शिरुर (कासार) जि.बीड यांनी सहशिक्षक मस्के डी.एन. यांना दि.13 जानेवारी 2017 रोजी निलंबीत करुन त्याच्यांवर गु.र.नं.08/2017 अन्वये पोलीस स्टेशन शिरुर (कासार)  जि.बीड येथे गुन्हा नोंद केलेला आहे. तसेच के.व्ही.उनवणे सहशिक्षक यांची गैरवर्तणूक तसेच शिस्त व अपील विषयक तरतूदीनूसार तीन वर्षाकरीता वार्षिक वेतनवाढ रोखली आहे. सहशिक्षक डी.एन.मस्के यांना अटक करण्यात आली असून सद्यस्थितीत पोलीस विभागामार्फत चौकशी सुरु आहे. त्याचप्रमाणे सदर घटनेस संस्था प्रशासन जबाबदार असल्याने संग्राम सेवाभावी संस्था, पिंपळनेर  ता.शिरुर (कासार) जि.बीड संचलित प्राथमिक आश्रमशाळा प्राथमिक आश्रमशाळा सिंदफणा ता.शिरुर (कासार)जि.बीड या आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्यासाठी प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास का सादर करण्यात येवू नये याबाबत संबंधित संस्थेच्या अध्यक्ष/सचिव यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आलेली आहे. तसेच प्रवेशित मुलींच्या संरक्षणाच्या दृष्टीने अध्यक्ष/सचिव, संग्राम सेवाभावी संस्था, पिंपळनेर ता.शिरुर (कासार) जि.बीड यांनी श्रीमती अमिना गुलाब पठाण यांची कंत्राटी पध्दतीने तात्काळ नियुक्ती केलेली आहे. त्या दि.13 जानेवारी 2017 रोजी रुजु झाल्या असून कार्यरत आहेत. अशी माहिती सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, बीड यांनी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा