बुधवार, २५ जानेवारी, २०१७

लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांनी मतदान करावे - मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे






            बीड, दि. 25 :- लोकशाहीने दिलेला मतदानाचा अधिकार प्रत्येक  नागरिकाने वापरला पाहिजे व आपली लोकशाही भक्कम करण्यासाठी मतदान केलेच पाहिजे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांनी केले.
            राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ननावरे बोलत होते. या कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी अनिल पवार, उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी, विकास माने यांची प्रमुख उपस्थिती होती. लोकशाहीच्या मजबुती करणासाठी मतदाराची भूमिका बजावतांना प्रत्येक मतदाराने आपली जबाबदारी ओळखावी असे सांगून मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांनी मतदानाचे महत्व स्पष्ट केले.
            मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असून प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन करीत अप्पर जिल्हाधिकारी पवार यांनी मतदार नोंदणीच्या मोहिमेची माहिती दिली व मतदानासाठी मतदार युवक युवतींनी पुढाकार घेण्याची गरज प्रतिपादन केली.
            राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाने आयोजित केलेल्या चित्रकला, निबंध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे वितरीत करण्यात आली. नवमतदारांना यावेळी मतदार ओळखपत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय मतदार दिनाची शपथ देण्यात आली. मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी जिल्ह्यात आयोजित विविध कार्यक्रमांची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी निऱ्हाळी यांनी दिली तर शेवटी वाघ यांनी सर्वांचे आभार मानले.
मतदार जागृतीसाठी रॅली
            जिल्हाधिकारी कार्यालयातील परिसरात 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रॅलीस निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅली मार्गस्थ केली. यावेळी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसिलदार छाया पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

            मतदार जनजागृतीविषयक रॅलीस जिल्हाधिकारी परिसरातून सुरुवात करण्यात आली. ही रॅली शिवाजी चौक, बशीरगंज, माळीवेस, सुभाष रोड, साठे चौक, बसस्थानक ते शिवाजी चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालय येथे दाखल होऊन समारोप करण्यात आला. रॅलीमध्ये मतदारांना जागृत करण्यासाठी उघडा डोळे, निट कान स्वच्छ उमेदवाराला करा मतदान आणि तुमचं मत तुमचा आवाज, मतदार होण्याचा मला अभिमान आहे यासह विविध घोषणा देण्यात आल्या या घोषणांनी शहर परिसर दणाणून गेला. रॅलीमध्ये बीड येथील विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्याथींनी, शिक्षक, अधिकारी-कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा