बुधवार, ३० नोव्हेंबर, २०१६

एड्स प्रतिबंध : एकसंघ लढा

एड्स प्रतिबंध : एकसंघ लढा
                          - अनिल आलुरकर
                                                जिल्हा माहिती अधिकारी,बीड

    1 डिसेंबर हा दिवस संपुर्ण जगभर जागतिक एड्स नियंत्रण दिन म्हणून साजरा केला जातो. 1 डिसेंबर पासून सर्वत्र एड्स नियंत्रण जनजागृतीसाठी विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यानिमित्ताने हा लेख देण्यात येत आहे.

       अलिकडच्या काळात एका असाध्य आजाराने देशातच नव्हे तर संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. त्या भस्मासूराचे नाव आहे. एड्स ! आता हया नावाला न ओळखणारा व्यक्ती शोधुन जगात सापडणार नाही. इतकी एड्स बद्दल जनजागृती झाली आहे. तरीपण प्रतिबंधात्मक उपाय योजनांबद्दल जनतेमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी 1 डिसेंबर 2008 पासून जागतिक एड्स नियंत्रण दिन सप्ताह जगभर साजरा केला जात आहे.
          जागतिक आरोग्य संघटनेने सर्वप्रथम 1988 साली जागतिक एड्स नियंत्रण दिनाची घोषणा केली. त्यानंतर पुढे दरवर्षी 1 डिसेंबर हा दिवस संपूर्ण जगभर एड्स नियंत्रण दिन म्हणून आयोजित केला जातो.
          जागतिक एड्स कार्यक्रमात घोषित वचननाम्यानुसार सर्व राष्ट्रांनी आपल्या राष्ट्रीय एड्स कार्यक्रमांतर्गत जोमाने कार्य करावे, अशी ग्वाही दिल्यानंतर नवीनच तयार झालेल्या जागतिक सुकाणू समितीने विविध राष्ट्रांचे प्रमुख व प्रतिनिधी यांनी एड्स कार्यक्रमासाठी एकदिलाने काम करण्याचा केलेला करार हा एड्सच्या जागतिक साथीच्या नियंत्रणासाठी एक महत्वाचा टप्पा आहे. त्यामुळे जगभर सर्वत्र एड्समुळे होत असलेल्या नुकसानीची तीव्रता जाणून तातडीने पावले उचलण्यासाठी प्रमाणिक, प्रभावी नेतृत्वाची आवश्यकता असल्याचे संकेत दिले गेले. यापूर्वी विविध राष्ट्रांनी आपापल्या राष्ट्रामध्ये एड्स विरुध्द लढा हा केवळ राष्ट्रांचा नसून जागतिक लढा आहे व त्यासाठी जागतिक पातळीवर एकत्रित लढा उभारण्याची आवश्यकता आग्रहाने मांडली.
एड्स विरुध्द लढा
          आंतरराष्ट्रीय समुदायाने केलेल्या घोषणापत्रात एड्स विषयी गैरसमजुती व भेदभाव दूर करणे व आरोग्यासाठी पायाभूत सोयींमध्ये वाढ करणे, एचआयव्ही/एड्स बाधित व्यक्तिंना आवश्यक सेवा, शुश्रूषा देणे इत्यादी गोष्टींचा अंतर्भाव आहे. अनेक वेळा या वचननाम्यामध्ये वेळापत्रकानुसार कामाची आखणी केल्यामुळे हा वचननामा एक प्रभावी हत्यार असून एड्स विरुध्द लढयामध्ये सामिल झालेल्या समाजातील सर्व घटकांना त्याचा आधार मिळतो.
          एड्स विरुध्द लढयामध्ये हे घोषणापत्र पुन्हा-पुन्हा समाजातील सर्व घटकांच्या सहभागाबद्दल आग्रही आहे. राष्ट्रातील सरकारी, सामाजिक तसेच जागतिक संघटना, मजूर संघटना, धामिर्क गट, पत्रकार आणि सर्वात महत्वाचा गट म्हणजे एचआयव्ही/एड्स बाधित स्त्री-पुरुष या सर्वांनी एकदिलाने एकत्रितपणे काम करण्याचा ध्यास घेवून आपल्या वचनपूर्तीसाठी प्रामाणिकपणे काम करुन संयुक्त राष्ट्र संघटनेच्या विशेष अधिवेशनात ठरविल्याप्रमाणे उद्दिष्टपूर्ती होईपर्यंत सतत कार्यरत रहावयाचे आहे. हा एड्स विरुध्द उद्दिष्टपूर्तीचा लढा केवळ राजकारणी नेत्यांचा नाही तर आपणा सर्वांचा आहे. या लढयामध्ये आपल्या सर्वांचे हे कर्तव्यच आहे. आम्हाला आशा आहे की, आपण सर्वजण वचन पाळाल. संयुक्त राष्ट्राचे महासचिव श्री. कोफी अन्नान यांनी एड्स साठी विशेष सभेत एड्स जगातील सर्वांचा शत्रु आहे व त्याच्या विरुध्द लढा हीच आपली सर्वांची प्राथमिकता असली पाहिजे असे म्हंटले आहे.
एड्स कार्यक्रमाची कार्यप्रणाली
          एड्स कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट हे एड्स साथीच्या विरोधात सर्वांना प्रोत्साहित करुन दीर्घकाळापर्यंत लढा देत राहण्यासाठी प्रेरणा देणे हे आहे.
          सर्व सहभागी गटांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सहकार्य करुन मदतीच्या कक्षा रुंदावण्याचे या कार्यक्रमाचे ध्येय आहे. जनजागृती करुन पूर्वीच्या ध्येय धोरणांची माहिती व वचनांची आठवण करुन देवून उद्दिष्टपूर्तीसाठी एड्स विरुध्द लढण्याचे यात आव्हान केले आहे. या वचनांसाठी राष्ट्रीय सरकारांना देखील आठवण करुन देवून जबाबदारीची जाणीव करुन देण्यात येत आहे.
कार्यक्रमाची उद्दीष्टे
       एचआयव्ही/एड्स विरुध्दच्या लढयात राष्ट्रीय सरकार व नेत्यांनी ठरविलेल्या धोरण, उदिष्टपूर्तीसाठी ते कार्यरत राहतील याची खात्री करुन देणे, एड्स विरुध्द कार्यक्रमांच्या परस्पर सहकार्याने स्थानिक प्रयत्नांची जागतिक प्रभावासाठी सांगड घालणे, एचआयव्ही/एड्स लढयासाठी आवश्यक असलेल्या सर्व सहाय्यक घटक उपलब्ध करुन देणे, एचआयव्ही/एड्स विरुध्द लढयासाठी समाजाचा प्रत्यक्ष सहभाग वाढवून त्याच्या कक्षा रुंदावणे व अधिक प्रबळ करणे. UNAIDS (युएनएड्स) हा जागतिक एड्स कार्यक्रमाचा प्रमुख तांत्रिक सल्लागार आहे. तथापि या कार्यक्रमात अनेक महत्वाचे घटक उद्दीष्टपूर्तीसाठी कार्यरत आहेत. यामध्ये राष्ट्रीय / सामाजिक कार्यक्रम, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सहकारी संस्था व सरकारे, एड्सचे प्रचारक व कार्यकर्ते, राष्ट्रीय एड्स नियंत्रण / प्रतिबंध कार्यक्रम, एड्स संघटना व सामाजिक संघटना, अशासकीय ऐच्छिक कार्य संघटना, जागतिक सहकारी गट उदा. ग्लोबल युनियन्स एड्स कार्यक्रम व ग्लोबल मुव्हमेंट फॉर चिल्ड्रेंन, सर्वसाधारण जनता, एचआयव्ही / एड्स बाधित व्यक्ती व त्यांच्या संघटना, महत्वाच्या / प्रतिष्ठित व्यक्ती, मालक व मजूर, धामिर्क संघटना, आरोग्य कर्मचारी, शिक्षक व विद्यार्थी, पत्रकार, जीएफएटीएम दी ग्लोबल फंड टू फाईट एड्स टी.बी / मलेरिया आदि कार्यरत आहेत.
          यावर्षीचे घोषवाक्य "होऊन सारे एकसंघ, करुया एचआयव्हीचा प्रतिबंध"असे आहे. म्हणजे नवीन एचआयव्ही संसर्ग होऊ द्यायचा नाही, कलंक आणि भेदभाव शुन्यावर आणने व एडसने होणाऱ्या मृत्युचे प्रमाण शुन्यावर आणणे असे आहे.सर्वांच्या सक्रीय सहभागाने एचआयव्ही / एड्स विरुध्दचा लढा अधिक तीव्र करुन या जागतिक समस्येचे समुळ उच्चाटन करण्याचा आपला प्रयत्न राहावा. भावी काळात हया आजाराचा प्रसार होवू नये याची  दक्षता घेण्याची आज नितांत गरज आहे. ही गरज ओळखून सुज्ञ जनतेने लढ्यात सहभागी व्हावे हीच अपेक्षा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा