शुक्रवार, १८ नोव्हेंबर, २०१६

न.प.निवडणूकीच्या कामकाजाचा घेतला आढावा निवडणूक यंत्रणा व पोलीस विभागाने समन्वयाने निवडणूकीस सज्ज व्हावे - जिल्हाधिकारी नवल किशोर राम



     
बीड, दि. 18 :- बीड जिल्ह्यातील सहा नगर परिषदांच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदान व मतमोजणी विषयक पूर्व तयारीचा आढावा सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून घेतांना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी निवडणूक यंत्रणा व पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून काम करावे व निवडणूका शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सज्ज रहावे असे आवाहन केले.
नगर परिषद निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी राम पुढे म्हणाले की, नगर परिषद निवडणूकीसाठी सर्व मतदान केंद्राच्या ठिकाणी पिण्याचे पाणी, वीज, अपंगांसाठी रॅम्पची व्यवस्था चोख असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व पोलीस अधिकारी यांनी सर्व मतदान केंद्रांना भेटी देवून पाहणी करावी व तेथील पोलीस बंदोबस्ताविषयी आराखडा तयार करावा. पोलीस विभागाने संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्राची माहिती घ्यावी. मागील काळातील घटनांची माहिती घेऊन अशा केंद्रावर अतिरिक्त बंदोबस्त ठेवावा. निवडणूकीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे अत्यंत आवश्यक असून त्यादृष्टीने पोलीस विभाग व उपविभागीय दंडाधिकारी यांनी प्रतिबंधात्मक कारवाईला वेग देण्याची गरज आहे असे ही ते म्हणाले.
स्थिर तपासणी पथके व अचानक तपासणी करणारी पथके जास्त सक्रीय करण्याची सुचना करुन जिल्हाधिकारी राम यांनी निवडणूकीच्या अनुषंगाने मतपत्रिका छपाई, पोस्टल मत पत्रिका, मतदान यंत्र सिलींग, मतदार पत्रिका, प्रशिक्षण, जनजागृती उमेदवारांकडील निवडणूक खर्च तपासणी इत्यादी बाबीविषयी सविस्तर आढावा घेतला. मतदारांना या निवडणूकीत एकापेक्षा जास्त वेळा मतदान करावे लागणार असल्याने मतदान प्रक्रीयेविषयी त्यांनाही प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे सांगून त्यांनी दृकश्राव्य माध्यमातून प्रशिक्षणाची व्यवस्था करण्याची सुचना केली. आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्यासाठी संपूर्ण निवडणूक यंत्रेणेने अधिक प्रभावीपणे काम करावे असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी सर्व नगर परिषद निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक हे मतदान केंद्रांना भेटी देवून प्रत्यक्ष आढावा घेणार असल्याचे सांगण्यात आले. मतदान व मतमोजणीच्या प्रक्रीयेसाठी सर्व ठिकाणी व्यवस्था चोख राहिल यादृष्टीने कार्यवाही करण्याच्या सुचना यावेळी करण्यात आल्या.

या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, निवडणूक निर्णय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणूक निरीक्षक, पोलीस अधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा