गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०१६

परळी नगर परिषद निवडणूक-2016 निवडणूक शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करावे - जिल्हाधिकारी नवल किशोर राम



बीड दि. 24 :- परळी नगर परिषदेची निवडणूक शांततेत व निर्भय वातारणामध्ये पार पाडण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे दिवसापर्यंत दक्ष राहून करावे असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.
परळी नगर परिषदेच्या पार्श्वभूमीवर नगर परिषद निवडणूकीच्या पुर्व तयारीचा आढावा जिल्हाधिकारी राम यांनी परळी तहसिल कार्यालयात घेतला यावेळी ते बोलत होते. यावेळी परळीचे निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लाटकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार विद्याचरण कडवकर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ.बी.डी.बिक्कड, अपर पोलीस अधीक्षक श्रीहरी बालाजी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले की, निवडणूकीचे काम करतांना अत्यंत जागरुक राहून करावे निवडणूका शांततामय व निर्भय वातारणात पार पडतील अशी भावना मतदारांमध्ये निर्माण करण्यासाठी सकारात्मकपणे व समन्वयाने काम करावे. मतदारांना कोणी प्रलोभन दाखवित असेल किंवा त्यांच्यावर दबाव टाकत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी. तसेच निवडणूकीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांपैकी कोणीही चुकीचे काम करीत असल्याचे किंवा कामांमध्ये दिरंगाई करीत असल्याचे निदर्शनास आल्यास त्‍यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राम यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना यावेळी देऊन निवडणूकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत निवडणूक कामावर लक्ष ठेवण्याच्या सुचना झोनल अधिकाऱ्यांना दिल्या.
निवडणूकीसाठी नियुक्त केलेल्या झोनल अधिकाऱ्यांची निवडणूकीमध्ये मोठी जबाबदारी आहे. झोनल अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील मतदान केंद्रांना भेटी देऊन तेथील व्यवस्थेबाबत आढावा घ्यावा. मतदान केंद्रावर मतदारांना कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच यासोबतच मतदान केंद्राच्या सुरक्षिततेसाठी पोलीस विभागाशी समन्वय ठेवावा अशा सुचनाही जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी केल्या.
निवडणूकीमध्ये काही मतदान केंद्रावर चार मतदान करावयाचे असल्याने अशा मतदान केंद्रावर जाऊन मतदाराचे प्रात्यक्षिक मतदारांना करुन दाखवावे. त्यासाठी आवश्यकता भासल्यास अधिकारी व कर्मचाऱ्यांना परिपूर्ण प्रशिक्षण द्यावे असेही जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी सांगितले. मतदानापूर्वी व्होटर स्लीप शंभर टक्के वाटप कराव्यात. ज्या मतदारांकडे मतदार ओळखपत्र नाहीत अशा मतदारांची योग्य ती ओळख पटवून मतदान करु द्यावे असेही जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी सांगितले.
संवेदनशील मतदान केंद्रावर व्हिडीओ कॅमेराची व्यवस्था ठेवावी तसेच आवश्यकता भासल्यास सीसीटीव्ही कॅमेरेही बसवावेत आणि या संवेदनशील केंद्रावर योग्य तो पोलीस बंदोबस्त  ठेऊन विशेष दक्षता घेण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.
जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी निवडणूक आचारसंहिता, खर्च, भरारी पथक, वाहन पथक, साहित्य पथक, मतदान यंत्र सुरक्षा कक्ष याबाबत सविस्तर आढावा घेतला व सुचना केल्या.
परळी नगर परिषद निवडणूकीमध्ये 16 प्रभागामधून 33 सदस्य व 1 नगराध्यक्ष निवडणून द्यावयाचे आहेत. यासाठी 83 मतदान केंद्रे आहेत. यापैकी काही मतदान केंद्रे आदर्श मतदान केंद्रे म्हणून तयार करण्यात आली आहेत. परळी शहरात एकुण 66,249 मतदार असून यापैकी 35564 पुरुष तर 30,695 स्त्री मतदार आहेत. तर 10 झोनल ऑफीसरच्या नियुक्त्या करण्यात आल्या असल्याची माहिती यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लाटकर यांनी दिली.
या बैठकीपूर्वी जिल्हाधिकारी राम यांनी परळी शहरातील 4 मतदान केंद्रे आणि मतमोजणी केंद्राला भेट देऊन तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला.                                                     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा