शनिवार, १९ नोव्हेंबर, २०१६

माजलगाव नगर परिषद निवडणूक-2016 निवडणूक सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जबाबदारीने व दक्ष राहून काम करावे - जिल्हाधिकारी नवल किशोर राम




बीड दि. 19 :- नगर परिषदेची निवडणूक सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अधिक जागरूकपणे करावे.तसेच या कामामध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई व गैरप्रकार होणार नाहीत यासाठी दक्ष रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.
नगर परिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज माजलगाव येथील निवडणूकीच्या पुर्वतयारीचा बैठकीत आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी तथा माजलगावचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीरंग तांबे, अपर पोलीस अधिक्षक श्रीहरी बालाजी, तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी एन.जी.झंपलवाड, नगर परिषदेचे मुख्याधिकारी बी.सी. गावित यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी राम म्हणाले की, नगर परिषद निवडणूका सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्यासह इतर संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परस्पर समन्वयाने काम करावे. निवडणूकीच्या कामामध्ये कोणीही प्रकारची दिरंगाई, हलगर्जीपणा करताना दिसून आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले असल्याने सर्वांची जबाबदारीने काम करावे अशा सूचना केल्या.
निवडणूकीसाठी नियुक्त केलेल्या झोनल अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक मतदान केंद्राला भेट देऊन तेथील व्यवस्थेबाबत माहिती घ्यावी. मतदारांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणारी यासाठी योग्य त्या        सोयी-सुविधा मतदान केंद्रावर उपलब्ध करुन द्याव्यात. तसेच मतमोजणी केंद्रातील व्यवस्था व सुरक्षा कक्ष याबाबत विशेष दक्षता घ्यावी. माजलगाव शहरातील 46 मतदान केंद्रांपैकी किमान  5 मतदान केंद्रे आदर्श मतदान केंद्र         (मॉडेल बुथ) म्हणून तयार करावीत असे जिल्हाधिकारी  नवल किशोर राम यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीत जिल्हाधिकारी राम यांनी आचारसंहिता पथक, निवडणूक खर्च, पोलीस बंदोबस्त, मतदान यंत्रे, व्हिडीयो चित्रीकरण, व्होटर स्लीप, भरारी पथक, वाहन व्यवस्था, निवडणूकीच्या कामाशी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण याबाबत सविस्तर आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या.
माजलगाव शहरात 12 प्रभाग असून निवडून द्यावयाच्या सदस्यांची संख्या 24 आहे तर मतदानासाठी 46 मतदान केंद्रे आहेत. माजलगाव शहरामध्ये एकूण मतदार संख्या 33 हजार 531 असून यापैकी 15 हजार 830 स्त्री मतदार असून 17 हजार 701 पुरुष मतदार असल्याची माहिती यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीरंग तांबे यांनी दिली. या बैठकीस निवडणूकीसाठी नियुक्त करण्यात आलेले झोनल ऑफीसर, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीपुर्वी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी माजलगाव शहरातील चार मतदान केंद्रे व मतमोजणी केद्राला भेट देऊन तेथील निवडणुकीच्या कामाबाबतच्या पुर्वतयारीची पाहणी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा